दिल्लीच्या ३ कारागृहांतून ११७ मोबाईल सापडले

दिल्ली, ६ जानेवारी २०२३ : दिल्लीच्या मंडोली कारागृहात अनेक मोबाईल फोन सापडल्यानंतर दिल्ली कारागृह विभागाने दोन उपअधीक्षक, एक सहायक अधीक्षक, एक हेड वार्डर आणि अन्य वार्डरला निलंबित केले आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडोली कारागृहातून मोबाईल फोन सापडल्यानंतर उपअधीक्षक प्रदीप शर्मा आणि धर्मेंद्र मौर्य, सहायक अधीक्षक सनी चंद्रा, हेड वार्डर लोकेश धामा आणि वार्डर हंसराज मीना यांना निलंबित करण्यात आले आहे. तुरुंग महासंचालक संजय बेनिवाल यांनी सर्व तुरुंग अधीक्षकांना शोधपथके तयार करण्याचे आणि कारागृहातील मोबाईल फोन आणि इतर प्रतिबंधित वस्तू शोधण्याचे निर्देश दिले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले, की गेल्या पंधरवड्यात सर्व तुरुंगांमध्ये केलेल्या शोधमोहिमेदरम्यान ११७ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

कारागृहाचे महासंचालक संजय बेनिवाल यांनी कारागृहात मोबाईल फोन पाठविणाऱ्यांवर व्यापक कारवाई करण्यासाठी कारागृह मुख्यालयात विशेष दक्षता पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने तमिळनाडू विशेष पोलिस दलासह १८ डिसेंबर रोजी छापा टाकला होता, ज्यामध्ये आठ मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे छापेमारी
तिहार तुरुंग, मंडोली तुरुंग आणि रोहिणी तुरुंगात गेल्या १५ दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या छाप्यात आतापर्यंत ११७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिहारचे डीजी संजय बेनिवाल यांच्या आदेशानुसार तिहार प्रशासन कारवाई करीत आहे. १४ तुरुंगाच्या बॅरेकची झडती घेण्यात आली, ज्यामध्ये अनेक गुंडांच्या टोळ्यांकडून मोबाईल जप्त करण्यात आले. गुंडांच्या टोळ्यांकडून जप्त केलेल्या मोबाईलची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पत्रही लिहिण्यात येत असल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या तीन तुरुंगांमध्ये मोबाईल सहज आणले जात आहेत आणि ही प्रक्रिया बराच काळ सुरू आहे. येथे बसविलेले जॅमरही काम करीत नाहीत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा