गर्दीत वादावादी आणि चेंगराचेंगरी… वैष्णोदेवी दुर्घटनेत 12 भाविकांचा मृत्यू, जाणून घ्या 10 मोठे अपडेट्स

जम्मू काश्मीर, 2 जानेवारी 2022: नवीन वर्षाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या भीषण अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असून ४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. जाणून घेऊया या अपघाताचे 10 मोठे अपडेट्स…

1- नवीन वर्षाच्या निमित्ताने दर्शनासाठी कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. दरम्यान, रात्री 2.45 च्या सुमारास वैष्णो भवन परिसरात परिस्थिती आणखीनच बिकट झाली. गेट क्रमांक-3जवळ चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग परिसरात दर्शनासाठी आलेल्या काही लोकांमध्ये आपापसात वादावादी झाली, त्यानंतर हाणामारी सुरू झाली आणि बघता बघता परिस्थिती आणखी बिघडली आणि चेंगराचेंगरी झाली.

2- या चेंगराचेंगरीत अनेक लोक पायाखाली तुडवले गेले. त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला. जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे 11 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ दर्शन थांबवण्यात आलं होतं, मात्र नंतर ते पूर्ववत करण्यात आलं.

3- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान मदत निधीतून मृतांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आलीय. तर, जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

4- हेल्पलाइन क्रमांक 01991-234804, 01991-234053 हे एलजी जम्मू आणि काश्मीर आणि श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डाच्या कार्यालयाने जारी केले आहेत. याशिवाय, इतर हेल्पलाइन क्रमांकांवरूनही माहिती मिळू शकते: पीसीआर कटरा: 01991232010 / 9419145182, पीसीआर रियासी 0199145076 / 9622856295, डीसी ऑफिस रियासी कंट्रोल रूम: 01991232010 / 01991232010 / 9419145182.

5- जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, काही लोकांमध्ये हाणामारी झाली आणि काही मुद्द्यावरून चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली.

6- प्रत्यक्षदर्शी सांगतात की, निर्धारित संख्येपेक्षा जास्त लोकांना आत जाण्यासाठी आवश्यक स्लिप देण्यात आल्या होत्या, त्यामुळं गर्दी झाली होती. वाटेत कुठेही स्लिप चेकिंग होत नसल्याचा दावाही अनेक प्रत्यक्षदर्शींनी केलाय. प्रत्यक्षदर्शींनी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुरक्षा दलांनी लाठीमार केला, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि हा अपघात इतका मोठा झाला, असेही सांगण्यात आले आहे.

7- अपघाताची संवेदनशीलता लक्षात घेता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीमध्ये गृह मंत्रालयाचे प्रधान सचिव, जम्मूचे एडीजीपी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश असेल.

8- प्रवेशाबाबत दोन गटात हाणामारी झाली होती, त्यात नंतर लक्षणीय वाढ झाल्याचेही सरकारी सूत्रांचं म्हणणं आहे. असं सांगितले जात आहे की लोकांचा एक गट चुकीच्या दिशेने जात होता आणि नंतर मंदिरात जाण्याचा प्रयत्न करू लागला. यावरून ही हाणामारी झाली.

9- अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची यादी

•धीरज कुमार (25), नोशेरा राजोरी जम्मू-काश्मीर
•श्वेता सिंग (35) पत्नी, विक्रम सिंग गाझियाबाद
•धरमवीर सिंग सालापूर सहारनपूर यूपी
•विनीत कुमार, मुलगा वीरपार सिंग सहारनपूर यूपी
•डॉ. अर्जुन प्रताप सिंग, मुलगा सतप्रकाश सिंग गोरखपूर यूपी
•विनय कुमार (24), महेशचंद्र बदरपूर दिल्ली
•सोनू पांडे, मुलगा नरेंद्र पांडे बदरपूर दिल्ली
•ममता पत्नी, सुरेंद्र बिरी झांझर हरियाणा
•चौघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

10- वैष्णोदेवीची यात्रा सामान्यतः इतर धार्मिक तीर्थक्षेत्रांपेक्षा अधिक शिस्तबद्ध आणि आयोजित केली गेली आहे. येथील सुविधाही जागतिक दर्जाच्या आहेत, मात्र नववर्षाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीची संख्या पाहता व्यवस्था अपुरी ठरली आणि दुर्घटना घडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा