लातूर, दि.६,मे २०२० : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच कुठली हि वैद्यकीय तपासणी न करता आणि प्रवासाची परवानगी न काढता प्रशासनाची दिशाभूल करून पुण्याहून दुचाकीवर आलेल्या १२ जणांना मंगळवारी (दि. ५ ) रोजी रात्री ७ च्या सुमारास १२ नंबर पाटी येथील चेक पोस्टवर पोलिस आणि अँटी कोरोना फोर्सच्या जवानानी पकडले. या बाराजणांना समाज कल्याण विभागांच्या वसतीगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता उंड्री पुणे येथून पाच दुचाकीवरुन निघालेल्या १२ मजुरांना लातुरच्या १२ नंबर पाटी, बार्शी रोड येथील चेक पोस्टवर पोलिस व अँटी कोरोना फोर्सच्या तरुणानी त्यांना पकडले. या बारा जणांमध्ये पाच महिला आणि ७ पुरुषांचा समावेश आहे. दहाजण उदगीर तालुक्यातील मुळचे राहिवाशी आहेत. तर एक दाम्पत्य कर्नाटक मधील गणेशपुर येथील आहे. हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्वजण मजूरीचे काम करतात.
लॉकडाऊन जेव्हापासून लागू झाले आहे. तेव्हापासून काम बंद आहे. त्यामुळे त्यांची उपासमार होत असून आतापर्यंत कोणीच मदत केली नाही. तसेच गावाकडे नातेवाइक निधन पावल्याने आम्ही गावाकडे जात असल्याचे पकडलेल्या लोकांनी सांगितले.
शिवाय पुण्यातून गावाकडे जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरला तरी अजूनही प्रशासनाने काहीच केले नाही.त्यामुळे दुचाकी वर गावाकडे निघालो असे या मजूरांनी सांगितले.
या बारा जणांना एसीएफच्या जवांनानी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यांची चौकशी केली. आणि प्रशासनाशी बोलून त्यांना रुग्ण समाज कल्याणच्या रुग्णवाहिकेतून नेऊन क्वारंटाइन केले आहे. ही कामगिरी एसीएफचे जवान भागवत कोतलवाड, बालाजी माळी, विशाल चव्हाण, प्रदीप शेवाळे, इरशाद शेख आणि मार्गदर्शक नरेंद्र बनसोडे यांनी पार पाडली.
न्युज अनकट प्रतिनिधी: