साखर कारखान्यातील विषारी वायूच्या प्रादुर्भावामुळे १३ कामगार गंभीर

माळेगाव, दि. २३ मे २०२०: माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील कच्ची साखर तयार होणाऱ्या पॅन मध्ये विषारी वायू तयार झाल्याने १३ कामगारांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना राज्यात नावाजलेला कारखाना म्हणून ओळखला जातो.

आज शनिवारी सकाळी येथील पॅनच्या टाकीत मिथेन हा विषारी गॅस तयार झाल्याने येथील काम करत असलेल्या तेरा कामगारांना विषारी गॅसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे.

कारखान्यातील कच्या साखरेवर प्रक्रिया केली जाते त्या टाकीत चिकट साखर मोकळी होण्यासाठी कामगारांनी काल या पॅन टाकीत पाणी सोडले होते. आज सकाळी त्यांनी झाकण उघडल्यावर टाकीत विषारी मिथेन गॅस तयार होऊन या तेरा कामगारांवर याचा परिणाम होऊन त्यांना चक्कर यायला लागल्यावर त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची तब्बेत गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजले आहे.

विषारी गॅसचा परिणाम झालेले कामगार पुढील प्रमाणे १) युवराज जनार्धन तावरे २)घनश्याम हनुमंत निंबाळकर ३) प्रवीण हिरालाल वाघ ४) रामचंद्र सायबू येळे ५) सुनील हिराजी पाटील ६) जालिंदर भोसले ७) शिवाजी लक्ष्मण भोसले ८) बाळासो यशवंत ढमाळ ९) शशिकांत जागांन्नाथ जगताप १०) सुनील शिवाजी आरोडे ११) सोमनाथ कोंडीबा चव्हाण १२) शरद पांडुरंग तावरे १३)संजय हरिभाऊ गावडे अशी या कामगारांची नावे आहेत. शहरातील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये मध्ये कामगारांनी मोठी गर्दी केली होती तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, नितीन सातव, स्वप्नील जगताप, मदानराव देवकाते, गुलाबराव देवकाते, राजेंद्र ढवाण यांनी कामगारांच्या तब्बेतीची विचारपूस केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा