उत्तराखंड, १९ जुलै २०२३: उत्तराखंडमधील चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर आज सकाळी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यात १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नमामी गंगे प्रकल्पांच्या ठिकाणी काम करत असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचावपथके घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे.
या दृर्घटनेत एका पोलीस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, रेलिंगवर करंट होता. तपासात अधिक तपशील समोर येईल, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी दिली आहे.
चमोलीच्या ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी अभियंता अमित सक्सेना यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री तिसऱ्या टप्प्यातील वीज खंडित झाली होती. बुधवारी सकाळी तिसरा टप्पा जोडण्यात आला, त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या आवारात विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर