नवी दिल्ली, २८ जुलै २०२३ : पुढील वर्षी, आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक (ICC T20 World Cup 2024) चा नववा सिझन, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी १५ संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ५ संघांची जागा अजूनही रिक्त आहे.
टी-२० वर्ल्ड कप २०२४ जूनमध्ये सुरू होणार आहे. टी-२० विश्वचषक २०२२ च्या टॉप-८ संघांसह आयसीसी क्रमवारीतील टॉप-१० मधील दोन संघ थेट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी यजमान असल्याने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेलाही थेट तिकीट मिळाले. याशिवाय आणखी ३ संघांनी पात्रता फेरी खेळून या स्पर्धेत स्थान मिळवले आहे. या १२ संघांव्यतिरिक्त, आयर्लंड, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांनी आतापर्यंत २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सहभागी होणारे उर्वरित ५ संघ अमेरिका क्वालिफायर, एशिया क्वालिफायर आणि आफ्रिका क्वालिफायरद्वारे ठरवले जातील. अमेरिकेतील १संघ आणि आशिया आणि आफ्रिकेतील २-२ संघांना विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते. १ डिसेंबरपर्यंत टी-२० विश्वचषक २०२४ च्या सर्व २० संघांची नावे स्पष्ट केली जातील.
वेस्ट इंडिज, अमेरिका, आयर्लंड, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड ह्या टीमनी तसेच भारताव्यतिरिक्त इंग्लंड, बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांनी आतापर्यंत थेट पात्रता मिळवली आहे.
टी-२० विश्वचषकात प्रथमच मुख्य फेरीत २० संघ सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली जाईल. ५-५ संघांच्या गटातील शीर्ष २-२ संघांना सुपर ८ साठी पात्र होण्याची संधी मिळेल. यानंतर सुपर ८ मध्ये प्रत्येकी चार संघांचे दोन गट केले जातील आणि या गटांमधील अव्वल २-२ संघांना थेट उपांत्य फेरीत संधी मिळेल आणि त्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल.
टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रकही जाहीर झालेले नाही. वृत्तानुसार, या स्पर्धेत एकूण ५० सामने होणार असून त्यापैकी एक तृतीयांश सामने अमेरिकेतील विविध शहरांमध्ये खेळवले जातील. अमेरिका प्रथमच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड