धाराशिव, २८ मार्च २०२३: चांगलं काम करुनही मला २०१९ च्या मंत्रिमंडळात तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थान दिले नाही. त्यामुळं संतप्त होऊन मी शिवसेनेतून पहिली बंडखोरी करीत देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पुढं दोन वर्ष शिवसेनेतील आमदारांचं कौन्सिलिंग करण्यासाठी १०० ते १५० बैठका घेतल्या. सोबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेचीही साथ होती. त्यामुळंच हे सरकार पाडण्यात यश आलं, असा गौप्यस्फोट आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलाय.
जिल्ह्यातील परंडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, की २०१९ च्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला असतानाही शरद पवार यांनी मिठाचा खडा टाकला आणि पक्षप्रमुख ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्या सरकारमध्येही मला स्थान दिलं नाही. त्यामुळं मी मातोश्रीवर जाऊन त्यांना सांगून आलो की मी पुन्हा या मातोश्रीची पायरी चढणार नाही. ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यातून मला लांब ठेवण्यात आलं.
त्यामुळं संतप्त होऊन मी फडणवीस यांच्या आदेशाने ३ जानेवारीला बंडखोरी करीत भाजपच्या साथीने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सलग दोन वर्षे हे सरकार पाडण्यासाठी कामाला लागलो. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यासोबत सतत बैठका झाल्या. जवळपास १०० ते १५० बैठका झाल्या. या काळात विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचं कौन्सिलिंग आम्ही करत होतो. तसेच हे सरकार पाडण्यात आपला कसलाही सहभाग नसल्याचं फडणवीस सांगत असले तरी त्यांचेही प्रयत्न उघड झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर