‘शिर्डी महोत्सवा’च्या आठ दिवसांत साईचरणी १८ कोटी

शिर्डी, ५ जानेवारी २०२३ : नाताळची सुटी, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘शिर्डी महोत्सवा’च्या आठ दिवसांत साईचरणी १८ कोटीचे दान भक्तांनी अर्पण केले. २५ डिसेंबर २०२२ ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत सुमारे ८ लाख साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात १७ कोटी ८१ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. १६ कोटी ८४ लाख ६९ हजार ३९६ रुपयांची देणगी रोख स्वरूपात, तर अन्य देणगी ही सोन्या-चांदीच्या रूपाने प्राप्त झाली.

‘शिर्डी महोत्सवा’च्या कालावधीत सुमारे आठ लाख साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. जनसंपर्क कार्यालय व ऑनलाइन सेवेचा यात समावेश आहे. ऑनलाइन व सशुल्क दर्शन,आरती पासेसद्वारे १ लाख ९१ हजार १३५ साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यातून ४ कोटी ५ लाख १२ हजार ५४२ रुपये प्राप्त झाले आहेत; तसेच श्री साई प्रसादालयात ५ लाख ७० हजार २८० साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. १ लाख ११ हजार २५५ साईभक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच ८ लाख ५४ हजार २२० लाडू प्रसाद पाकीटांची विक्री करण्यात आली असून, त्यातून संस्थानला १ कोटी ३२ लाख १९ हजार २०० रुपये प्राप्त झालेले आहेत.

साईआश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (५०० रूम) व साईप्रसाद निवास येथे १ लाख २८ हजार ५२ साईभक्तांनी निवास केला. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात १६ हजार २०७ साईभक्तांनी आश्रय घेतला. या दोन्ही ठिकाणी १ लाख ४४ हजार २५९ साईभक्तांची निवासाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली होती. ३१ डिसेंबर २०२२ व १ जानेवारी २०२३ या दोन दिवसांत १७१ साईभक्तांनी रक्तदान केले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा