दिल्ली १६ फेब्रुवारी २०२५ : उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून, यासाठी भाविक मोठ्या संखेने कुंभमेळयात स्नान करण्यासाठी जात आहेत. यासाठी अनेक भागातून विशेष ट्रेन सुद्धा सोडल्या जात आहेत. यातच नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून प्रयागराजला जाण्यासाठी दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. काल प्रयागराजला जाण्यासाठी या विशेष चालवल्या जाणाऱ्या गाडीमध्ये चढण्यासाठी भाविकांनी मोठ्या संखेने गर्दी केली होती. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर रात्रीच्या सुमारस चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये १८ जणांना आपला जीव गमवावा लागला असून १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर जखमी झालेल्या प्रवासांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत दिली आहे. शनिवारी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर भाविकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्याच दरम्यान ही घटना घडली आहे. आता नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज जंक्शनवर सुद्धा सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया :
काल घडलेल्या घटनेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी वैष्णव म्हणाले की,’ नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे. दिल्ली पोलिस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे ‘ पुढे एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले की, “चेंगराचेंगरीत ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावले आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर