महाड, २५ ऑगस्ट २०२०: महाडमध्ये काल कोसळलेल्या तारीक गार्डन या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून नुकतंच एका लहान मुलाला जिवंत बाहेर काढलं असून, त्यामुळे वाचलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे. आतापर्यंत दोन जणांचा बळी गेला असून आठ जण जखमी झाले आहेत.
अजून १८ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी अपघाताच्या ठिकाणाला भेट देऊन बचाव कार्याची माहिती घेतली.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तारीक गार्डन या इमारतीचा बिल्डर तसंच अर्किटेक्टसह पाच जणांवर महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बिल्डर फारुक काझी आणि युनुस शेख दोघेही फरार आहे.
दरम्यान, महाड इथल्या या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनीही दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करीत मृतांना आदरांजली अर्पण केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथकं सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी