जम्मू काश्मीर मध्ये 2 दहशतवादी ताब्यात, एक भाजपच्या आयटी सेलचा प्रभारी

जम्मू-काश्मीर, 4 जुलै 2022: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातून रविवारी गावकऱ्यांनी 2 दहशतवाद्यांना पकडलं. त्यांच्याकडून दोन एके सिरीज रायफल, 7 ग्रेनेड, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.

तालिब हुसैन आणि अमद दार अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. तालिब हा राजौरीचा तर अहमद दार हा बारामुल्लाचा रहिवासी आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील तुकसान गावातून दोघांना अटक करण्यात आलीय. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे सक्रिय सदस्य आहेत.

9 ते 27 मे दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक तालिब हुसैन यानेही भाजपमध्ये घुसखोरी केली आहे. त्याला जम्मू प्रांतातील अल्पसंख्याक आघाडीचे आयटी आणि सोशल मीडिया सेलचे प्रभारी बनवण्यात आले. मात्र, तो केवळ 18 दिवस पक्षाशी जोडला गेल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. तालिब याने 9 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 27 मे रोजी राजीनामा दिला.

गावकऱ्यांना मिळणार 7 लाखांचं बक्षीस

जम्मू-काश्मीरच्या या दहशतवाद्यांना पकडणाऱ्या गावकऱ्यांना राज्यपालांनी 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. त्याचवेळी डीजीपींनी गावकऱ्यांना 2 लाख रुपये देण्याची घोषणाही केलीय.

यावर्षी 118 दहशतवादी मारले गेले

गेल्या महिन्यात असं सांगण्यात आलं होते की, जानेवारीपासून आतापर्यंत खोऱ्यात झालेल्या चकमकीत 118 दहशतवादी मारले गेले आहेत. त्यात 32 विदेशी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. आयजीपी काश्मीरच्या म्हणण्यानुसार, सहा महिन्यांत मारल्या गेलेल्या 118 दहशतवाद्यांपैकी 77 पाकिस्तानी प्रायोजित लष्कर-ए-तैयबाचे सदस्य होते. त्याचवेळी, सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेलेले 16 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य होते. गेल्या वर्षी (2021) जानेवारी ते जून या कालावधीत लष्कराने 55 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये 2 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा