पुरंदर तालुक्यातील २० ते २५ प्राथमिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

पुरंदर, २५ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यामध्ये सध्या शासनाच्या  निर्देशाप्रमाणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑफलाइन शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यामुळे दिनांक २३ आणि २४  डिसेंबरला तालुक्यात सुमारे सव्वाशे शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये २० ते २५ शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शासनाने अजून याबाबत अधिकृत धोषणा केली नाही. मात्र, यामुळे तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात चिंतेचे  वातावरण पसरले आहे.तर पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने  विद्यार्थी व त्यांचे पालक यांचीही कोरोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये सामाजिक अंतर ठेवून सर्व काळजी घेवून  सॅनिटायझर, मास्कचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. काही ठिकाणी स्वयंप्रेरणेने शिक्षण देत आहेत.  ज्याठिकाणी ऑनलाईन सुविधा नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये दररोज ५० % शिक्षक उपस्थित राहून शालेय कामकाजा बरोबर विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षण देत आहेत.  त्यामुळे शिक्षकांचा संपर्क विद्यार्थी व पालकांशी देखील येतो असे गृहीत धरून पुरंदरच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानुसार १२५ शिक्षकांनी केलेल्या चाचणी मध्ये सुमारे २० ते २५ प्राथमिक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामधील काही शिक्षकांना कसलीही लक्षणे नसताना देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
ज्या गावातील प्राथमिक शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या गावातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे संपर्क आलेल्या सर्वांशी कोरोना टेस्ट होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची आहे.
याबाबत प्रशासनाने देखील शिक्षकांना सहकार्य करावे म्हणजे उरलेले शिक्षक  पॉझिटिव्ह येणार नाहीत. ज्या ज्या गावातील शिक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या त्या गावातील इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पंधरा दिवस अन्य कोणाशी संपर्क न ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने द्याव्यात. ज्याप्रमाणे शिक्षकांकडून संपर्क येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रादुर्भाव होवू शकतो. त्याप्रमाणे शाळेमध्ये संपर्क येणाऱ्या विद्यार्थी  व पालकांमुळे देखील उरलेल्या शिक्षकांना प्रादुर्भाव होऊ शकतो. तरी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी शाळेत जाणाऱ्या शिक्षकांप्रमाणे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील कोरोना टेस्ट करण्याची मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे करण्यात येत आहे. याबाबतचे एक निवेदन शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा