पुणे, ३ जुलै २०२३: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० च्या नोटा चलनातून बाद केल्याचा परिणाम दिवसेंदिवस दिसून येत आहे. बँकांमध्ये लोक घाईघाईने २००० च्या नोटा जमा करतायत किंवा बदलून घेत आहेत. आकडेवारीनुसार, १९ मे पासून चलनात असलेल्या ८७ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत व बदलण्यात आल्या आहेत.
१९ मे पासून लोक बँकांमध्ये २००० च्या नोटा बदलून घेतायत किंवा जमा करत आहेत. आकडेवारी पाहता १९ मे पर्यंत बाजारात ३.५६ ट्रिलियन नोटा चलनात होत्या. ज्यामध्ये सुमारे २.७० लाख कोटी २००० च्या नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. नोटा जमा करण्याचे किंवा बदलण्याचे काम या गतीने सुरू राहिल्यास आरबीआय आता अंतिम मुदतीपूर्वी लक्ष्य गाठेल.
RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी लोकांना ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करा किंवा त्या बदलून घ्या, असे आवाहन केले होते. मात्र, ३० सप्टेंबरनंतर या नोटा बदलल्या जाणार नाहीत. सोमवारी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २००० च्या नोटा बँकांमध्ये खूप वेगाने परत येत आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका, असे आवाहन आरबीआय सातत्याने करत आहे. आरबीआयच्या आवाहनाचा परिणामही दिसून येत आहे. १९ मे पासून चलनात आलेल्या ८७ टक्के नोटा परत येणे हा त्याचा पुरावा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड