२ हजारांची नोट होणार बंद.. काय आहे कारण? वाचा नेत्यांच्या प्रतिक्रिया

पुणे, २० मे २०२३: २००० च्या नोटा आता चालणार नाही, अशी घोषणा रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकतीच केली. दोन हजाराच्या नोटा परत घेण्यासाठी बँकांना सांगण्यात आलंय. २००० रुपयांची नोट लगेचच बंद होणार नाही किंवा चलनातून बाद होणार नाही. मात्र इतर बँकांना २ हजारांची नोट ग्राहकांना देऊ नका, अशी सूचना करण्यात आलेलीय. या नोटा पुन्हा बँकेत जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. ही बातमी समोर येतात अनेक तज्ञांकडून आणि राजकीय व्यक्तींकडून यावर प्रतिक्रिया आल्या.

दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचं कारण काय?

मोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर रिझर्व बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनात आल्या होत्या. आरबीआय कायदा १९३४ अंतर्गत कलम २४(१) अन्वये या नोटा चलनात आल्या. नोटबंदी झाली तेव्हा १००० रुपयांच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. तर ५०० रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या होत्या. म्हणजेच पाचशे रुपयांच्या जुना नोटा बंद करण्यात आल्या होत्या. चलनात निर्माण झालेली ही कमतरता भरून काढण्यासाठी आरबीआय ने २ हजाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. तात्पुरत्या वापरानंतर या नोटा २०१८-१९ साली छापणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं. मार्च २०१७ सालीच या नोटांचा वापर येत्या चार-वर्षांपुरताच करण्यात येईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले होते. या अनुषंगाने हळूहळू या नोटा बाजारातून कमी होताना दिसत होत्या. अखेरीस, रिझर्व्ह बँकेच्या क्लिन नोट पॉलिसीअंतर्गत २००० रुपयांच्या नोटा मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय बालिश- पृथ्वीराज चव्हाण

एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय बालिश आहे. मागच्या नोटबंदीची ३ मोठी उद्दिष्टं होती, पाकिस्तानचा दहशतवाद बंद होईल, भ्रष्टाचार बंद होईल, काळा पैसा नष्ट होईल, मात्र यातील एकही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मागील नोटबंदीच्या निर्णयामुळे स्वत: मोदी अक्षरश: तोंडघशी पडले, नोट बदली करण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर गर्दी केली आणि शेकडो माणसं मृत्यूमुखी पडल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

अजित पवारांची प्रतिक्रिया

रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबर अशी मुदत दिलीय. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. “मागं एकदा सरकारने सांगितलं की ५०० आणि हजाराची नोट बंद. काल फतवा काढला की दोन हजारांची नोट बंद. याला काय अर्थ राहिला आहे का? महिलांनी जपून ठेवलेल्या नोटा आता बँकेत द्या आणि बदलून घ्या.” पुढं ते म्हणाले की, आपल्या देशाने इंदिरा गांधीचा काळ पाहिला, वाजपेयींचा काळ पाहिला, मोदींच्या आधी मनमोहन सिंह पंतप्रधान होते आपण तो काळही पाहिला. काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला, बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.”, असं अजित पवार म्हणालेत.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया

यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “या विषयावर मी तेव्हाही भाषण केलं होतं. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती का? कधीही गोष्ट आणायची, कधीही बंद करायची, त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. हे असले निर्णय परवडणारे नसतात देशाला. आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?

संजय राऊतांची प्रतिक्रिया

प्रसार माध्यमांशी बोलताना राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मागं सुद्धा सरकारने आतंकवाद, भ्रष्टाचार, काळा पैसा अशी कारणं देत नोटबंदी लादली होती. त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. उलट देशाच्या अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला. आता परत २००० ची नोट बंद केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा