नवी दिल्ली, २१ सप्टेंबर २०२०: हळूहळू २००० रुपयांच्या नोटा चलनात कमी होत आहेत, याचं एक मोठे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांत एटीएममधून २००० रुपयांच्या नोटा कमी बाहेर येत आहेत. अलीकडे असे अनेक अहवाल समोर आले आहेत की सरकारनं २००० रुपयांच्या नोटा छापण्यास बंदी घातली आहे. यावर आता सरकारनं संसदेत स्पष्टीकरण दिलंय.
अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी लोकसभेत सांगितलं की २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्याबाबत सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. लोकसभेत लेखी उत्तरात अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चा सल्ला घेतल्यानंतर विशिष्ट नोटांच्या छपाईचा निर्णय सरकार घेत आहे.
अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, सन २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षात २००० च्या नोटांच्या छपाईसाठी कोणतंही मागणी पत्र पाठवलं नाही. परंतु, असं असूनही सरकारनं नोटांचे मुद्रण थांबविण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ते म्हणाले की, ३१ मार्च २०२० पर्यंत २००० रुपयांच्या २७,३९८ लाख नोटा चलनात आल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत ३२,९१० लाख नोटा चलनात आल्या. २०१८ च्या अखेरीस चलनामध्ये हजर असलेल्या २००० च्या नोटांची संख्या ३३,६३२ लाख होती.
रिझर्व्ह बँकेच्या सन २०१९-२० च्या वार्षिक अहवालानुसार मार्च २०१८ अखेर प्रचलित असलेल्या २,००० नोटांची संख्या, ३३,६३२ लाख होती, जी मार्च २०१९ अखेर ३२,९१० लाखांवर आली. मार्च २०२० च्या अखेरीस चालनामध्ये आलेल्या २,००० च्या नोटा आणखी घटून ती २७,३९८ लाखांवर गेली.
या अहवालानुसार मार्च २०२० च्या अखेरीस प्रचलित एकूण चलनात २००० हजारांच्या नोटांचा वाटा कमी होऊन २.४ टक्के झालाय. मार्च, २०१९ अखेर ते ३ टक्के आणि मार्च २०१८ अखेर ३.३ टक्के होते. या अहवालानुसार, २०१८ पासून तीन वर्षात ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांच्या प्रसारात लक्षणीय वाढ झालीय. ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांची मूल्य आणि प्रमाण दोन्हीनुसार प्रसारण वाढलं आहे.
कोरोनाच्या संकटामुळं लॉकडाऊन दरम्यान नोटांचं मुद्रण थांबविण्यात आलं होतं, असं केंद्रीय मंत्र्यांनी आरबीआयच्या वतीनं स्पष्ट केलं. परंतु, नंतर केंद्र / राज्य सरकारांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता छपाई होत आहे. कर्मचार्यांमध्ये कोरोना संसर्गामुळं महाराष्ट्रातील नाशिकमधील शासकीय मुद्रण कार्यालयात नोटांचं मुद्रण तीन वेळा थांबवावं लागलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे