२०२० मध्ये साजऱ्या होणार महापुरुषांच्या जयंती

आगामी सन २०२० या वर्षात कोणत्या महिन्यात व कोणत्या दिवशी महापुरुषांची जयंती साजरी अपेक्षित आहे. याची रुपरेषा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निश्‍चित केली आहे. त्यानुसार ३७ राष्ट्रपुरुष, थोर व्यक्‍ती यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात यावे, असे आदेश सर्व शासकीय कार्यालयांतील विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

जानेवारी महिन्यात चार महापुरुषांच्या, थोर व्यक्‍तींच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेऊन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यात ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती, १२ जानेवारी रोजी जिजाऊ माँसाहेब जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करुन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यातही चार महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज यांची जयंती, १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंती, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात येणार आहे.

मार्च महिन्यात १२ मार्च रोजी यशवंतराव चव्हाण जयंती, २३ मार्च रोजी शहीददिन साजरा करण्यात येणार आहे. शहीद दिनाच्या दिवशी शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये चार महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येणार आहे.

याशिवाय ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, २६ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती, ३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात येणार आहे.

मे महिन्यात २१ मे रोजी दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन साजरा करुन दहशतवाद , हिंसाचारविरोधी दिवसाची शपथ घेण्यात येणार आहे. २५ मे रोजी महाराणा प्रतापसिंह जयंती, तर २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात येणार आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

जून महिन्यात २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी वसंतराव नाईक जयंती, २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती, ३ ऑगस्ट रोजी क्रांतीसिंह नाना पाटील जयंती, २० ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस पाळून शपथ घेण्यात येणार आहे.

७ सप्टेंबर रोजी राजे उमाजी नाईक जयंती, २५ सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती, २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री जयंती, १५ ऑक्टोबर रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती, ३१ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी जयंती, इंदिरा गांधी स्मृतीदिन, वल्‍लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकतादिन साजरा करण्यात येणार आहे.

१४ नोव्हेंबर रोजी पंडित नेहरु जयंती, १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती, १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मतादिन साजरा करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संधिधान दिन साजरा करुन भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा