मुंबई, ६ नोव्हेंबर २०२२ : सध्या परिस्थिती पाहता राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं भाकीत वर्तविलंय. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? या चर्चेनं जोर धरलाय.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचा विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले. राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. त्यामुळं कामाला लागा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीय. निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात. त्यामुळं केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात. त्यामुळं कामाला लागा असंही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगितल्याचं समजतं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर