नवी दिल्ली, दि. २५ मे २०२०: भारतातील कोट्याधीश आणि सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे लहान बंधू अनिल अंबानी सातत्याने आर्थिक पेचा मध्ये अडकलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनिल अंबानी सातत्याने आर्थिक अडचणीत सापडत आलेले आहेत. एक अडचण संपत नाही तर समोर दुसरे संकट येऊन उभे राहिलेले असते. आता पुन्हा एकदा ब्रिटनमधील एका न्यायालयाने दिलेल्या सुनावणीनंतर त्यांची समस्या वाढली आहे.
एका कर्जाशी संबंधित प्रकरणाची सुनावणी यूकेच्या कोर्टात सुरू आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी २१ दिवसांत चीनमधील तीन बँकांना सुमारे ५४ अब्ज ४८ कोटी ४८ हजार रुपयांची देय रक्कम द्यावी. कर्ज कराराअंतर्गत ही रक्कम अंबानींकडून वसूल केली जाईल.
लंडनमधील इंग्लंड आणि वेल्सच्या हायकोर्टाच्या व्यावसायिक विभागात अनिल अंबानीशी संबंधित खटला चालू आहे. चीनमधील तीन बँकांचा समावेश असलेल्या प्रकरणात अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी देण्याचा युक्तिवाद विवादित(नाकारला आहे) म्हणून वर्णन केला आहे.
परंतु नुकतीच या खटल्याची सुनावणी घेताना न्यायमूर्ती नाईजेल टायरे यांनी हे स्पष्ट केले की ज्या वैयक्तिक हमीचा वाद होत आहे तो अनिल अंबानींवर बंधनकारक आहे. जस्टिस टायर यांनी आदेश दिला की ही हमी अनिल अंबानीवर बंधनकारक आहे आणि हमी म्हणून त्यांना चीनी बँकांना, ७१,६९,१७६८१.५१ डॉलर (सुमारे ५४ अब्ज ४८ कोटी ४८ हजार रुपये) द्यावे लागतील. पैसे परत करण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
अनिल अंबानी कर्जाची परतफेड कशी करणार?
अशा वेळी अनिल अंबानी हे पैसे कुठून आणि कसे देतील किंवा या प्रकरणाबाबत कोर्टात दाद कशी मागतील, ही बाब पाहण्यासारखी ठरणार आहे. याआधीही अंबानीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले होते की अंबानींच्या कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत आणि यामुळे ते कर्ज फेडण्याच्या स्थितीत नाहीत.
या चिनी बँकांच्या संबंधित खटल्यामध्ये समावेश असलेल्या अनिल अंबानी यांच्या वकिलांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, “हा खटला आठ वर्षांपूर्वी घेतलेल्या कर्जाबाबत रिलायन्स कम्युनिकेशन्सने दिलेल्या वैयक्तिक हमीशी संबंधित आहे.” अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने कोर्टाने दिलेल्या आदेशाच्या याविरुद्ध दावा केला आहे, ते म्हणाले की ” हे अनिल अंबानींचे वैयक्तिक कर्ज नाही. इंडस्ट्रियल एंड कमर्शियल बैंक ऑफ चाइना च्या वतीने जो दावा केला गेला आहे त्याच्यावर अनिल अंबानी यांनी कधीही स्वाक्षरी केली नव्हती. अनिल अंबानी यांनी या कर्जाची वैयक्तिक हमी घेण्याचा दावा देखील कोणाकडे केला नव्हता.”
अनिल अंबानी यांच्या वकिलाच्या प्रवक्त्याने सांगितले की ब्रिटिश कोर्टाच्या निर्णयाबद्दल आणि या खटल्याबाबत अंबानी कायदेशीर सल्ला घेत आहेत. प्रवक्त्यांनी अनिल अंबानीची भविष्यातील पावले उघड केली नाहीत परंतु कायदेशीर कारवाई केली जाईल असे संकेत दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी