पुरंदर, दि.३० एप्रिल २०२०: पुरंदर तालुक्यातील तोंडल येथे आलेला पाहुणा दोन दिवसाच्या पाहुणचारानंतर कोरोना पाॅझिटीव्ह निघाला असल्याची माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.
असे असले तरी प्रत्यक्ष पुरंदरमधील कोणीही व्यक्ती कोरोना पाॅझिटीव्ह नसल्याचे सांगत, लोकांनी घाबरून न जाण्याचे अवाहन त्यांनी लोकांना केले आहे.
याबाबात मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथे राहणारा एक तरूण दि.२७.४.२०२० रोजी तोंडल येथे सासऱ्यांसाठी औषधे घेऊन आला होता. त्याने तोंडल येथे दोन दिवस मुक्काम केला. हडपसर येथील त्याचे मित्र कोरोना पाॅझिटीव्ह निघाल्याने प्रशासनाने त्याचा शोध घेवून तपासणी केली असता, तो कोविड १९ पाॅजिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या २२ व्यक्तींची आरोग्य विभागाने ओळख पटवली आहे . त्यापैकी कोणालाही आजपर्यंत काेणतीहि कोरोनाचे लक्षणे नाहीत. परंतू प्रोटोकॉल नुसार प्रशासनाने त्या सर्वांना सासवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. तेथून त्यांचे स्वैब तापसणीकरिता पुणे येथे शनिवारी किंवा रविवारी पाठविण्यात येतील असे तहसीलदारांनी सांगितले आहे.
दरम्यान प्रत्यक्ष पुरंदर तालुक्यात आजपर्यंत कोणीही कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण नाही. लोकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी केले आहे.
पुरंदर तालुका हा पुण्याला लागून असलेला तालुका आहे. मात्र अजुनपर्यंत कोरोनाचा प्रवेश या तालुक्यात झाला नव्हता. मात्र बाहेरून आलेल्या एका व्यक्तीमुळे आता पुरंदर मध्ये सुध्दा कोरोना रूग्ण मिळाल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे