पुणे, २३ एप्रिल २०२३: महाराष्ट्रातील पुण्यात एक वेदनादायक अपघात घडला. पुणे-बेंगळुरू महामार्गावर नर्हे परिसरात आज पहाटे तीनच्या सुमारास ट्रक आणि खासगी बसमध्ये भीषण धडक झाली. धडक होताच बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. माहिती मिळताच पोलिसांनी प्रवाशांची सुटका करून त्यांना बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी चार प्रवाशांना मृत घोषित केले, तर २२ प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, प्रवाशांच्या ओरडण्याचा आवाज स्थानिक लोकांनी ऐकला तेव्हा ते घटनास्थळी पोहोचले. घाईघाईत त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. बसमध्ये प्रवासी इतके वाईट परस्थितीत अडकले होते की, त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप धडपड करावी लागली. बचावकार्यात अग्निशमन दलाचीही मदत घ्यावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. बसमध्ये एकूण २६ जण होते. सर्वांना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २२ प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, बस कोल्हापूरहून डोंबिवलीकडे जात असताना अपघात झाला. प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यासाठी बसच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच, खिडक्यांच्या काचा कटरने कापून प्रवाशांची सुटका केली. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड