पुणे, दि.६ मे २०२० : राज्याच्या विविध भागातून मजूरांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
याचाच एक भाग म्हणून मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या राजस्थान येथील मजूरांना जिल्हा प्रशासनाने राजस्थानला जाण्यासाठी बसचे आयोजन केले. प्रशासनाचे नियोजन, सोशल डिस्टंसिंगचे अत्यंत काटेकोर पालन करत वैद्यकीय तपासणी केलेल्या या २४ मजुरांना आज(बुधवारी) दुपारी बसने राजस्थानकडे रवाना करण्यात आले.
यावेळी तहसिलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी पासलकर व पिरंगुट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायतीच्या हद्दीत आपली उपजीविका भागविण्यासाठी कार्यरत असलेले राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील २४ मजूरांना आज त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मजूरांसाठी निवारागृहे उभारण्यात आली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अनेक मजूरांना निवारागृहांचा आधार मिळत आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधे काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने आपल्या हाताला इथे रोजगार मिळेल त्यामुळे आपण इथे राहू शकता, अशी विनंती प्रशासनाने मजूरांना केली.
मात्र, मजूरांनी आजपर्यंत केलेल्या व्यवस्थेबाबत प्रशासनाचे आभार मानत गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मजूरांच्या इच्छेवरून प्रशासनाने सर्व मजूरांची पिरंगुट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी व जिल्हाधिकारी, पुणे यांची परवानगी घेत मजूरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले. ही बस मजूरांना घेवून राजस्थानकडे रवाना झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: