पुण्यातील रुबी हॉल मधील २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे : पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयातील १९ नर्सेससह २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी रुबी रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इतर डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर अशा सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती.

त्यानंतर आलेल्या अहवालात १९ नर्सेस आणि इतर सहा कर्मचारी असे एकूण २५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या २५ जणांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांव्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णालयात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

रुबी हॉल तसेच इतर रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्सेस तसेच इतर संबंधित कर्मचार्‍यांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट अर्थात पीपीई किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. ससून रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या सर्व वैद्यकीय सहकाऱ्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे.
डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांचा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांशी थेट संपर्क येतो. अशा परिस्थितीमध्ये सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची पुरेशी काळजी शासनाने घेणे आवश्यक आहे अशी अपेक्षा या कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा