राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू

मुंबई, दि. ११ मे २०२०: कविड-१९ संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प झाले आहेत. राज्यावर देखील याचा विपरित परिणाम दिसत आहे. उद्योग विभागाने ठोस पावले उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्यास सुरुवात होत आहे. असे मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वेबिनारमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

रेड झोन वगळता राज्यात ५७ हजार ७४५ उद्योगांना परवाने दिले आहेत, त्यापैकी २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. सुमारे साडेसहा लाख कामगार कामावर रुजू देखील झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ९,१४७ कारखान्यांना परवाने देण्यात आले आहे, त्यापैकी ५,७७४ कंपन्यांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे , मात्र महाराष्ट्र ग्रीन झोन करायचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प असल्याने आपली पहिली लढाई कोरोना सोबत आहे, त्यामुळे उद्योगांनी घाई करू नये. सर्वांनी सहकार्य करावे असे देसाई यांनी आवाहन केले.

स्थिर वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक झाली. जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी माहिती दिली.

लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासंबंधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गाैडा, पियूष गोयल यांच्यात दैनंदिन चर्चा होत आहे. याशिवाय लघु उद्योगांच्या इतर सुविधांबाबत राज्याचे धोरण ठरविणे सुरू करण्यात आले आहे.

राज्यात विदेशी गुंतवणूक येण्यासाठी वाटाघाटी सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक देशांकडून महाराष्ट्राकडे याबाबत चौकशी देखील झाली आहे. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरिया येथील प्रतिनिधींची उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लघु उद्योगांनी मोठ्या प्रकल्पांना सेवा पुरवण्यासाठी सज्ज रहावे असे देखील यावेळी देसाई यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा