पाकचे पितळ उघडे पडणार का?

6
Will Pakistan's brass be exposed?
पाकचे पितळ उघडे पडणार का?

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. भारताने अमेरिकेशी केलेल्या प्रत्यार्पण करारामुळे त्याला त्याचे भारतात परत येणे सुकर झाले असले, तरी त्याचा साथीदार डेव्हीड हॅडली याला मात्र अमेरिकेने भारताच्या ताब्यात दिलेले नाही. राणा याच्यासारखेच दहा गुन्हेगारांचे प्रत्यार्पण अजून व्हायचे आहे. मुंबईवर २६/११ वरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला होता. राणा भारताच्या ताब्यात आल्यामुळे पाकिस्तानला आपले पितळ उघडे पडण्याची भीती वाटत असल्याने आता पाकिस्तानने राणाशी आपला काहीही संबंध नाही, असा पवित्रा घेतला आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आला आहे. त्याची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था आणि  ‘रॉ’ च्या संयुक्त पथकाने त्याला अमेरिकेतून आणले आहे. तो भारतात पोहोचताच पाकिस्तान घाबरला आणि हताश होऊन तहव्वूर राणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या प्रत्यार्पणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने त्याचे वर्णन कॅनेडियन नागरिक म्हणून केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की राणाने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाक कागदपत्रांचे नूतनीकरण केले नाही. त्याचे कॅनेडियन नागरिकत्व अगदी स्पष्ट आहे. आता प्रश्न असा आहे, की पाकिस्तानला सर्वात मोठी भीती कशाची आहे? तो चिंताग्रस्त का आहे? तर याचे पहिले कारण म्हणजे तहव्वूर राणाचे पाकिस्तानी लष्कराशी असलेले थेट संबंध. त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असले, तरी त्याचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. तो पाकिस्तानी लष्कर आणि ‘आयएसआय’च्या जवळचा आहे.

तो पाकिस्तानी लष्करात डॉक्टर राहिला आहे. त्यामुळे तहव्वूर राणा २६/११ प्रकरणातील पाकिस्तानचे संपूर्ण गुपित उघड करेल, अशी भीती आता पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानी लष्कर, ‘आयएसआय’ आणि पाकिस्तान सरकार मिळून दहशत पसरवतात, हे उघडेनागडे सत्य असून, ते राणाच्या तोंडून बाहेर आले, की जग त्यावर आणखी शिक्कामोर्तब करेल, अशी पाकिस्तानला भीती वाटते. पाकिस्तान तीन वर्षांपूर्वीच ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर आला होता. यामागे दहशतवाद्यांचा निधी थांबवल्याचे कारण देण्यात आले. पाकिस्तान दहशतवादाच्या मुद्द्यावरून जगाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे हाफिज मसूदच्या सुरक्षेबाबत घाबरत आहे. पाकिस्तानला खरी भीती हाफिज सईद आणि मसूद अझहर यांसारख्या दहशतवाद्यांबद्दल आहे. भारत त्यांनाही ताब्यात देण्याची मागणी करेल किंवा भारताच्या शत्रूंना यमसदनी धाडण्याच्या ज्या एकामागून एक घटना पाकिस्तानात होत आहेत, त्यात या दोघांचा समावेश होण्याची भीती पाकिस्तानला वाटते.

 गेल्या काही वर्षांत भारतावर हल्ले करणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे मारले जात आहे, त्यामुळे देश आधीच घाबरलेला आहे. हाफिज सईदचा जवळचा सहकारी अबू कतालच्या हत्येनंतर ही भीती वाढली आहे. हाफिजच्या या निकटवर्तीयाने काश्मीरमधील यात्रेकरूंना लक्ष्य केले होते; परंतु ‘आयएसआय’देखील त्याला वाचवू शकली नाही. राणाच्या प्रत्यार्पणानंतर हाफिज-मसूदवर दबाव वाढेल, अशी भीती पाकिस्तानला वाटते. त्यामुळेच आता घाबरलेल्या २६/११ हल्ल्याबाबत अशा गोष्टी बोलल्या जात आहेत, ज्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. २६/११ ला खोटा हल्ला सांगून भारताला गोत्यात उभे करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे; पण आता त्याला यश मिळणे कठीण होणार आहे. कारण जगाला त्याचे वास्तव कळाले आहे. याबाबत राणाची साक्ष पाकिस्तानच्या तोंडावर चपराकच ठरेल, कारण तो पाकिस्तानच्या दहशतवादी कटाचा प्रमुख सूत्रधार आहे. याआधीच अमेरिकेने पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला आहे.

‘एफबीआय’ने तहव्वूर राणाला पकडले, तेव्हा त्याचे लष्करशी असलेले संबंध उघड झाले. लष्कर ही पाकिस्तानची दहशतवादी संघटना आहे, हे जगाला माहीत आहे. राणाला २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला अमेरिकेत ‘लष्कर-ए-तोयबा’ला पाठिंबा दिल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. त्याच्यावर मुंबई आणि कोपनहेगनमधील हल्ल्याचा आरोप आहे. मुंबई २६/११ हल्ल्यातील डेव्हिड कोलमन हेडलीच्या साक्षीच्या आधारे अनेक पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ च्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. राणा आता यासंदर्भातील आणखी अनेक गुपिते उघड करू शकतो. त्यापैकी सर्वात मोठे नाव हाफिज सईदचे आहे. त्यानेच २६/११ च्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते. यानंतर दुसरे नाव झकी-उर-रहमान लखवीचे आहे.

 हेडलीने लख्वीचे वर्णन ‘लश्कर’चा ऑपरेशनल कमांडर असा केला आहे. त्यानेच हल्ल्याची योजना आखली आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले. यानंतर तिसरे नाव साजिद मीर याचे आहे. हेडलीने त्याचे मुख्य हँडलर म्हणून वर्णन केले, जो हल्ल्यादरम्यान कराचीतून दहशतवाद्यांना सूचना देत होता. चौथे नाव मेजर इक्बालचे आहे. हेडलीने त्याला सांगितले की तो ‘आयएसआय’ अधिकारी आहे आणि त्याने त्याला २५,००० डॉलर्स दिले. मुंबई हल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षणात मदत केली. या बाबी आता पुढे आल्या असून, राणाच्या कबुली जबाबातून अशा अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. राणा याचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करून भारतात आणल्यानंतर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले. भारत आणि अमेरिकेच्या कायद्यांचा विचार केला, तर राणाला फाशीची शिक्षा होऊ शकते. 

प्रत्यार्पणाच्या प्रकरणात, आरोपी ज्या देशातून येत असेल, तेथे फाशीची शिक्षा असेल तर त्याला भारतातही फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते. राणा कॅनडाचा नागरिक असल्याने काही फरक पडत नाही. गुन्हा भारतात घडला असेल, तर भारतीय कायद्यानुसार त्यावर कारवाई केली जाईल. प्रत्यार्पणाच्या बाबतीत, ज्या देशातून आरोपीला आणले जाते तो देश अटी घालू शकतो; परंतु जर त्या देशातील गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा असेल, तर सामान्यत: फाशीची शिक्षा न देण्याची अट घालत नाही, तरीही प्रत्यार्पण ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत आणि दोन्ही देशांचे कायदे आणि प्रत्यार्पण करार हे दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारी कृत्यांसाठी भारतीय कायद्यानुसार शिक्षेचे प्रमाण मानले जाते.

मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशीची शिक्षा झाली आहे. प्रत्यार्पणाच्या पत्रात नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये आणि आरोपांमध्येच राणाविरुद्ध खटला चालवला जाईल. राणा याच्यावर दहशतवादाचा आरोप आहे. त्याच्यावर भारतावर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे आणि दहशतवादाच्या गुन्ह्यासाठी अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा आहे. भारतीय न्यायव्यवस्थेने फाशीच्या शिक्षेसाठी दुर्मिळातील दुर्मिळ असे तत्त्व घालून दिले असले, तरी भारतीय न्यायव्यवस्थाही दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्यास मागेपुढे पाहत नाही आणि त्याचे उदाहरण म्हणजे मुंबई हल्ल्याचा गुन्हेगार अजमल कसाब, संसद हल्ल्याचा गुन्हेगार अफझल गुरू आणि मुंबईतील बॉम्बस्फोट घडवून आणणारा याकुब मेमन या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राणाला काय शिक्षा होणार, याची चर्चा होणे स्वाभावीक आहे. डेव्हीड हेडली याने राणाला भारतविरोधी कटात मदत केली आहे; परंतु अमेरिकन नागरिक असलेल्या हेडलीचे अमेरिकेने भारतात प्रत्यार्पण केलेले नाही. तो अमेरिकन तुरुंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे. 

हेडलीने अमेरिकन सरकारला सहकार्य करून फाशीची शिक्षा टाळली. अमेरिकेने हेडलीला भारताकडे सुपूर्द करण्यास नकार दिला. डेव्हिड कोलमन हेडलीचे खरे नाव दाऊद सईद गिलानी आहे. तो राणाचा बालपणीचा मित्र आहे. त्याचे वडील पाकिस्तानी, तर आई अमेरिकेची आहे. हेडलीचा जन्म ३० जून १९६० रोजी अमेरिकेत झाला. हेडली आणि राणा यांची भेट हसन अब्दाल कॅडेट कॉलेजमध्ये शिकत असताना झाली. हेडली पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये सामील झाला. त्याच्या मनात भारताविरुद्ध द्वेष भरला होता. त्याचा फायदा ‘लष्कर-ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेने उचलला. हेडली हा दहशतवादी हाफिज सईदचा चांगला मित्र होता. हेडलीला संघटनेत प्रशिक्षण देण्यात आले होते.

 हाफिज सईदसोबत तो अनेकदा जेवायला जात असे. हेडली सध्या अमेरिकन तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २४ जानेवारी २०१३ रोजी त्याला अमेरिकेतील शिकागो येथील न्यायालयाने १२ दहशतवादी प्रकरणांमध्ये ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यामध्ये मुंबई हल्ला आणि डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रावरील प्रस्तावित हल्ल्याचा समावेश होता. त्याच्या शिक्षेमध्ये पाच वर्षांच्या पर्यवेक्षित सुटकेचा समावेश आहे आणि फेडरल नियमांनुसार त्याने त्याच्या शिक्षेच्या किमान ८५ टक्के तुरुंगात पूर्ण करणे आवश्यक आहे; मात्र तो कोणत्या तुरुंगात आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. भारतात दहशतवादी हल्ला करूनही त्याचा ताबा भारताला मिळालेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी, भागा वरखाडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा