नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022: केंद्रीय गृह मंत्रालयानं बुधवारी राज्यसभेत सांगितलं की, 2018, 2019 आणि 2020 या वर्षांमध्ये देशात बेरोजगारीमुळं सुमारे 10 हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचबरोबर या 3 वर्षात 16,091 लोकांनी दिवाळखोरी आणि कर्जामुळं आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच या कारणांमुळे एकूण 26 हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीच्या आधारे गृह मंत्रालयाने ही माहिती दिलीय.
केंद्रानं दिलं राज्यसभेत उत्तर
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात राज्यसभेत सांगितलं की, 2018 ते 2020 पर्यंत बेरोजगारीमुळं किती लोकांनी आपला जीव दिला. एनसीआरबीच्या आकडेवारीचा संदर्भ देत मंत्रालयानं सांगितलं की भारतात 2018 मध्ये 2741, 2019 मध्ये 2851 आणि 2020 मध्ये 3548 लोकांनी बेरोजगारीमुळं आत्महत्या केल्या आहेत.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, दिवाळखोरी आणि कर्जामुळं 2018 मध्ये 4970, 2019 मध्ये 5908 आणि 2020 मध्ये 5213 जणांनी आत्महत्या केल्या. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, विविध विरोधी खासदारांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला असून, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशाला भेडसावणाऱ्या समस्येला तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात फारशी तरतूद केली जात नसल्याचा आरोप केलाय.
विरोधक बनवत आहे बेरोजगारीला मुद्दा
खरं तर, भारतात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. त्याचवेळी देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असताना हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे