दौंडमधून उजनी धरणात २७१७ क्यूसेकनी आवक

सोलापूर, दि. १८ जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरणावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी असून, चालू हंगामात उजनीतून दौंडमधून २ हजार ७१७ क्युसेकचा विसर्ग सुरू झाला आहे. उजनी जलाशय क्षेत्रात संततधार चालू असल्याने भीमा खो-यातील धरणांतील पाणीसाठ्यात वाढ दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठा दोन टक्क्यानी वाढला आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत उजनी धरणात २ टक्का पाणीसाठा वाढला आहे. आतापर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात ५५ मि.मी. पाऊस पडला असून त्याचाही परिणाम उजनी पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे उजनी पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे होण्यास आशा निर्माण झाल्या आहेत.

भीमा नदीच्या खोर्‍यात असलेल्या सर्व धरणांमध्ये १६ जून रोजी एकूण १९ धरणांचा पाणीसाठा उपयुक्त आहे. खोर्‍यातील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणात मात्र नेहमीप्रमाणेच वजा २३ टक्के इतका पाणीसाठा आहे. उर्वरित १९ धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा आहे.

गेल्या ३ वर्षांत पाऊस लांबत गेल्याने भीमा नदीच्या खोर्‍यात पाण्याची कमतरता निर्माण होत होती. मात्र गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळे पाणी वापरही नियंत्रित झाले. यंदाच्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे.

यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून १५ जून रोजी तब्बल सहा दल.घ.मी. पाणीसाठा आहे. उजनी वगळता वरील १९ धरणांमध्ये सरासरी २० टक्के इतका पाणीसाठा आहे. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदिप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा