पालघर, ११ जुलै २०२३ : पालघर पोलिसांनी एका ४२ वर्षीय व्यावसायिकावर काही कारणावरून झालेल्या वादातून अॅसिड फेकल्याप्रकरणी, तिघांना अटक केली आहे. पीडित मोबीन शेख हे विरार परिसरातील गोपचरपाडा येथे एलईडी लाईटचे दुकान बंद करून घरी जात असताना ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, दोन जणांनी पीडित व्यक्तीवर अॅसिड फेकले, ज्यामुळे तो गंभीर भाजला. ते म्हणाले की, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले, गुप्तचर आणि तांत्रिक माहिती गोळा केली आणि मस्तान उस्मान शेख, संकेत शर्मा आणि जयेश तारे या तिघांना आज अटक केली.
अधिकाऱ्याने सांगितले की, मस्तान शेखचा पीडितसोबत काही कारणावरून वाद झाला होता. त्याच्यावर अॅसिड फेकण्यासाठी त्याने अन्य दोन आरोपींना चार लाख रुपये दिले होते. संबंधित तरतुदीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तसेच मस्तान शेखवर विरार पोलिस ठाण्यात यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड