मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह मधील ३० महत्वाची वक्तव्ये 

मुंबई, दि, १३ सप्टेंबर २०२०: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. दुपारी १ वाजता त्यांनी cmomaharashtra या फेसबुक पेजवरून जनतेला संबोधित केलं. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. कोरोना, शेतकऱ्यांची कर्जमाफी, माझं कुटुंब माझी जबाबदारी योजना, मराठा आरक्षण, पिकांना मिळणारा हमीभाव अशा अनेक मुद्यांवर मुख्यमंत्री बोलले. मात्र त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरण, कंगना रनौत प्रकरण यांच्यावर जराही भाष्य करणं टाळलं आहे. सोबतच मराठा समाजाला आंदोलन न करण्याचं आव्हान त्यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह मधील महत्वाचे मुद्दे:

१) कोरोनाचं संकट गेलं नाही, उलट वाढलेल आहे… संपूर्ण जगात दुसरी लाट आली आहे की काय असे भितीदायक चित्र समोर येत आहे.
२) मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे उत्तर नाही.
३) मी कोरोना या विषयावरच बोलणार आहे… कोरोनाचे संकट अधिक अक्राळ विक्राळ स्वरुप धारण करेल की काय अशी शंका जगभर व्यक्त केली जात आहे.
४) आता जबाबदारी व खबरदारी याचे मी वाटप करणार आहे.
५) महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव रचला जात आहे त्याविषयी मी बोलेन.. आता नाही, वेळ आल्यावर मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून मी राजकारणावर बोलेन पण माझं अधिक लक्ष कोरोनावरच असणार आहे.
६) कोरोनावर मात करण्यासाठी आता नवीन मोहीम सुरू करणार… प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे ही जबाबदारी. माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राज्यभर राबवणार आहे.
७) सदा सर्वदा मास्क लावावा.
८) गरज नसेल तर घराबाहेर पडू नका.
९) मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा ही त्रिसूत्री पाळा.
१०) राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा.
११) नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी.
१२) ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार.
१३) फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावु नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका.
१४) इतरांसोबत जेवताना समोरासमोर बसु नका, बाजुला असेल, काळजी घेतली तर दुर्दैवाने कोणाला संसर्ग झाला असेल तर दुसर्‍याला होणार नाही.
१५) मुख्यमंत्री घरात बसून काम करतात. मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बैठक घेत आहे, काम करत आहे. जिथे तुम्हीं जात नाही अशा दुर्गम भागात देखील मी पोहोचलो आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून… बैठका ऑनलाइन घ्या.
१६) हे युद्ध आहे, यात खारीचा तरी वाटा उचला. हे युद्ध आहे, जनता जर युद्धात सहभागी झाली तर जिंकु.जिम – रेस्टॉरंट देखील सुरू करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सुरक्षिततेच्या नियमावलीस प्राधान्य. नियमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.
१७) बंद जागेत भेटणे टाळा, एसीचा वापर कमी करा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका.
१८) एका गोष्टीच समाधान आहे की आपण जे वचन शेतकर्‍यांना दिलं होत कर्जमुक्तीच ते आपण पालन करत आहोत.. 29.5 लाख शेतकर्‍यांना आपण कर्जमुक्तीचा लाभ दिला आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.
१९) 1.75 कोटी थाळ्यांचे वितरण शिवभोजन योजनेद्वारे झाले आहे.
२०) 3 लाख 60 हजार बेड्सची आपण सोय केली आहे.
२१) विक्रमी कापूस उत्पादन झाले त्याची खरेदी केलेली आहे; महाराष्ट्रातील कुपोषित साडे सहा लाख बालकांना मोफत दुधफुकटी वाटप केले आहे, सव्वा लाख स्तनदा मातांना पण ही भुकटी मोफत देत आहोत.
२२) पूर्व विदर्भातल्या पूरग्रस्तांना 18 कोटींची मदत.
२३) कुठेही उणीव न ठेवता सर्व आघाड्यांवर सरकार कार्यरत आहे. शेतकर्‍यांच्या पाठीशी अधिक उभे आहोत कारण शेतकरी वर्क फ्रॉम होम करू शकत नाही.
२४) शेतकरी त्याच्या परिवारातील… होय त्याच्या परिवारातील ‘बैल’ कारण तो त्याच्या परिवारातील सदस्यच असतो त्याला बैल देखील गहाण टाकावा लागतो.. म्हणून मी नवीन योजना आणत आहे.
२५) आजपर्यंत जे ‘पिकेल ते विकेल’ होतं, परंतु आता जे ‘विकेल ते पिकेल’ योजना आणत आहोत. हमी भाव नाही आता हमखास भाव!
२६) गटशेती, असंघटित शेतकर्‍यांना संघटन करून त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले जाणार. कुठल्या बाजारपेठेत कशाची मागणी आहे ते बघुन ‘दर्जेदार पीक देणारा माझा महाराष्ट्र’ अशी ओळख निर्माण करणार.
२७) शेतीमध्ये क्रांती करायची आहे… महाराष्ट्राची ‘प्रयोगशील राज्य’ ही ओळख आहे.
२८) मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आपण एकत्र लढलो. सर्वपक्षीय एकत्र लढलो. पूर्वीच्या सरकारचे कोणतेही वकील बदलले नाहीत, उलट अधिक वकील दिले. कोर्टात आर्ग्युमेन्ट करायला कमी पडलो नाही.
२९) तुमच्या आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत.
३०) मुंबईत पण शिथिलता येत आहे..वागण्यात शिथिलता येऊ देऊ नका. कायदे करावे लागणार मास्क घातले नाही,गर्दी झाली तर कारवाई करावी लागणार.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा