साकीनाका बलात्कार प्रकरणी 346 पानांचे आरोपपत्र दाखल, 77 साक्षीदारांचे जबाब

9

मुंबई, 29 सप्टेंबर 2021: मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या पाशवी बलात्कार प्रकरणी मंगळवारी मुंबई पोलिसांनी दोषारोपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी अवघ्या 18 दिवसांत तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं आहे. 346 पानांचे आरोपपत्र दाखल करण्याआधी पोलिसांनी तब्बल 77 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

साकीनाका येथील महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणातील नराधम मोहन चौहानला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी हा खटला जलदगतीनं चालविण्यात येईल असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यानी जनतेला दिलं होतं. आता पोलिसांना अवघ्या 18 दिवसांत या प्रकरणाचा तपास केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 77 जणांचे जबाब नोंदवून घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिंडोशी न्यायालयात तब्बल 346 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

पानांच्या या आरोपपत्रातील माहितीनुसार पीडित महिला ही आरोपीला आधीपासूनच ओळखत होती. गुन्हा घडला त्याच्या 25 दिवस आधीही आरोपीनं महिलेला भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच कालावधीनंतर ती त्याला भेटली तेव्हा रागाच्या भरात नराधमानं तिच्यासोबत हे अमानुष कृत्य केलं. यात लोखंडी सळीचाही त्यानं वापर केल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे