३५० आरोग्य पथके करणार झोपडपट्टी भागातील तपासणी : डॉ. म्हैसेकर

पुणे : २७ एप्रिल २०२० :
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने, झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी ३५० पथके तयार करण्यात आली आहेत. यामुळे आरोग्य तपासणी वेगाने होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा विकार आहेत त्यांच्यासाठी कोरोना जीवघेणा ठरत आहे. यावर मत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून आता एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या असलेल्या भागात ३५० पथके पाठविण्यात येत आहेत. या पथकांकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. विविध विकार असलेल्या रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना कोरोनाबाबत जागरूक करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.
पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत आपल्या घरातील ज्येष्ठ तसेच इतर काही विकार असणाऱ्या व्यक्तीला तपासून वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या घरात वेगळ्या खोलीमध्ये ठेवणे किंवा मनपाने सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोरोना या रोगावर मात करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. ६० ते ७० टक्के लोकांना हा रोग जीवघेणा ठरत नाही, मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या मोहिमेअंतर्गत त्यांची तपासणी करुन घ्यावी , असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा