पंजशीर, २ सप्टेंबर २०२१: तालिबान एका बाजूला अफगाणिस्तानात शांततेने सरकार बनवण्याचा आणि चालवण्याचा दावा करत आहे. पण दुसरीकडे तालिबानी लढाऊ सातत्याने पंजशीर परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नॉर्दर्न अलायन्सने ट्विटरवर दावा केला आहे की काल रात्री खवाकमध्ये हल्ला करण्यासाठी आलेले सुमारे ३५० तालिबानी लढाऊ मारले गेले आहेत, तर ४० हून अधिक लोकांना पकडण्यात आले आहे. NRF ला या काळात अनेक अमेरिकन वाहने, शस्त्रे मिळाली आहेत.
यापूर्वी असे वृत्त आले होते की, तालिबान्यांनी मंगळवारी रात्री पंजशीरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, जिथे त्यांची नॉर्दर्न एलायंसच्या (NRF) लढवय्यांशी चकमक झाली.
स्थानिक पत्रकार नैतिक मलिकजादा यांनी केलेल्या ट्विटनुसार, अफगाणिस्तानच्या पंजशीरच्या प्रवेशद्वारावर गुलबहार भागात तालिबान लढाऊ आणि नॉर्दर्न एलायंसच्या लढवय्यांत चकमक झाली आहे. एवढेच नाही तर तालिबान्यांनी येथे एक पूल उडवल्याच्या बातम्याही आहेत. याशिवाय अनेक लढाऊ पकडले गेले आहेत.
याआधी सोमवारी रात्री देखील तालिबान आणि नॉर्दर्न एलायंसच्या लढाऊ सैनिकांमध्ये चकमक झाली होती, तेव्हा सुमारे ७-८ तालिबान लढाऊ मारल्याची माहिती होती. पंजशीर अजूनही तालिबानपासून दूर आहे, जिथे अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली नॉर्दर्न एलायंस तालिबान विरूद्ध लढत आहे.
अहमद मसूदचे प्रवक्ते फहीम दष्टी यांनीही तालिबानशी लढण्याची पुष्टी केली. फहीमच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री तालिबान्यांनी पंजशीरमध्ये हल्ला केला आणि घुसखोरीचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी झाला नाही. तालिबानने आधीच पंजशीर परिसरातील इंटरनेट बंद केले आहे. मात्र, नंतर ते उघडण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे