गोल पोस्ट महाराष्ट्र राज्यभिषेक सोहळ्याची प्रशासनाकडून जैयत तयारी,रायगडावर रंगणार ३५० वर्षपूर्ती शिवराज्याभिषेक सोहळा

राज्यभिषेक सोहळ्याची प्रशासनाकडून जैयत तयारी,रायगडावर रंगणार ३५० वर्षपूर्ती शिवराज्याभिषेक सोहळा

पुणे १ जून २०२३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांना सुविधा देण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

यंदा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा साजरा होण्यापूर्वी रायगडावर आज शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली शिवभक्तांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे. शिवभक्तांचा उत्साह पाहता यंदा रायगड मोठा जल्लोष पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.

उद्या (२ जून) रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्यात आजपासूनच रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ६ जून रोजी देखील सकाळी ८.३० वाजता रायगड किल्ल्याच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाचाड येथे १ ते ६ जून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी एकाच वेळी साडेतीन हजार वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर १० हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी ४० हजार लीटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ वैद्यकीय केंद्र उभारली जाणार आहेत. यात गडावर सहा, पायऱ्यांवर सहा तर पायथ्याशी सात आणि वाहनतळावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहे.

गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात ३ हेलिपॅड बनविण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग मात्र निमंत्रितांसाठी मर्यादित असणार आहे. रायगड किल्ले परिसरात जवळपास २ हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version