गोल पोस्ट agralekh अग्रलेख ना झुकले, ना वाकले, ना विकले!

ना झुकले, ना वाकले, ना विकले!

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात बाळासाहेब ठाकरे हे नाव केवळ एका नेत्यापुरते मर्यादित नाही, तर ते एक युग आहे. व्यंगचित्रकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास, लाखो मराठी माणसांचा बुलंद आवाज बनून थांबतो, हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य ठरते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे निर्भीड विचार, आक्रमक शैली, स्पष्ट भूमिका आणि सत्तेपेक्षा विचाराला प्राधान्य देणारे नेतृत्व. त्यांची आजपासून जन्मशताब्दी. जळता निखारा असे ज्यांचे वर्णन केले जाते, त्या बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाशझोत.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे होती, आहेत, की ती केवळ सत्तेच्या खुर्च्यांवरून मोजता येत नाहीत. ती व्यक्तिमत्त्वे काळावर राज्य करतात. समाजाला ढवळून काढतात आणि इतिहासाची दिशा बदलतात.

बाळासाहेब ठाकरे हे त्यापैकीच एक. ते केवळ एखाद्या पक्षाचे प्रमुख नव्हते, तर ते एक जिवंत आंदोलन होते. असंतोषाचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा धगधगता निखारा होते. बाळासाहेब म्हणजे शब्दांचा वज्रनाद. भीती न बाळगता सत्ता, व्यवस्था आणि ढोंग यांना आव्हान देणारा आवाज. त्यांनी कधीही लोकप्रियतेची भीक मागितली नाही, तरी लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. कारण बाळासाहेब तोंडी लोकांचे बोलणे होते, जे अनेकांच्या मनात असायचे; पण उच्चारण्याची हिंमत कुणाचीच नसायची. ती बाळासाहेबांकडे होती. ते समाजप्रबोधनाच्या परंपरेतून आलेले नेतृत्व होते. त्यांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे जातीय विषमता, धार्मिक ढोंग आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारे निर्भीड योद्धे होते. बाळासाहेबांनी हीच बंडखोर परंपरा पुढे नेली, पण अधिक थेट, अधिक आक्रमक आणि अधिक परिणामकारक पद्धतीने. औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत न बसलेले बाळासाहेब हे वेगळेच रसायन होते. आयुष्याच्या विद्यापीठाला त्यांनी अनुभवातून आकार दिला. त्यांनी समाज वाचला, माणसांची मानसिकता ओळखली आणि राजकारणातील ढोंगाची नस पकडली. त्यामुळेच त्यांचे शब्द लोकांच्या काळजात घुसायचे. राजकारणात येण्याआधीच बाळासाहेबांनी लेखणी आणि रेषांच्या माध्यमातून सत्तेला छेद दिला होता. ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘मार्मिक’ त्यांच्या व्यंगचित्रांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली. ही व्यंगचित्रे केवळ हसवणारी नव्हती, तर व्यवस्थेचे वस्त्रहरण करणारी होती.

जिथे इतर पत्रकार आणि विचारवंत शब्दांची काळजी घ्यायचे, तिथे बाळासाहेब थेट बोट ठेवायचे. हीच निर्भीडता पुढे त्यांच्या राजकारणाची ओळख बनली. मुंबईत मराठी माणूस दुय्यम ठरवला जात होता, नोकऱ्यांपासून दूर लोटला जात होता आणि त्याची भाषा, संस्कृती हसण्याचा विषय बनली होती. तेव्हा इतर पक्ष निवडणुकीच्या गणितात अडकले होते; पण बाळासाहेबांनी थेट प्रश्न विचारला, ‘या राज्यात मराठी माणूस परका का?’  ‘मराठी माणसाचा हक्क मराठी माणसालाच’ ही घोषणा काहींना संकुचित वाटली; पण वास्तवात ती अस्मितेची गर्जना होती. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना राहिली नाही, तर रस्त्यावर उतरलेली चळवळ बनली. शिवसैनिक म्हणजे पक्षाचा कार्यकर्ता नव्हे, तर स्वाभिमानासाठी लढणारा सैनिक झाला. बाळासाहेबांचे भाषण ऐकणे म्हणजे राजकीय अनुभव नव्हे, तर मानसिक धक्का होता. कोणताही कागद नाही, कोणताही संकोच नाही आणि कोणतीही माफी नाही, त्यांचे शब्द सरळ हृदयात घुसायचे. ते राजकीय शिष्टाचार पाळत नसत, कारण त्यांना शिष्टाचार नव्हे, तर सत्य महत्त्वाचे वाटत होते.  ते विरोधकांच्या कमकुवत नसांवर नेमका घाव घालायचे. ते कोणाला खूश करण्यासाठी बोलत नव्हते, ते जनतेच्या रागाला शब्दरुप देत होते. लोकशाहीत सत्तेचा सर्वोच्च टप्पा म्हणजे निवडणूक जिंकणे; पण बाळासाहेबांनी हा नियमच मोडून काढला. त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, तरी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार त्यांच्या एका शब्दावर हालायचे. सत्ता त्यांच्या पायाशी लोळण घालत होती.शिवसेना–भाजप सरकार १९९५ मध्ये सत्तेत आले, तेव्हा बाळासाहेब मुख्यमंत्री नव्हते; पण राज्य कोण चालवत आहे, हे सगळ्यांना माहीत होते. त्यांनी सिद्ध केले, की सत्ता खुर्चीत नसते, ती व्यक्तिमत्त्वात असते. त्यांचे बाळासाहेबांचे हिंदुत्व हे तथाकथित धर्मनिरपेक्षतेला अस्वस्थ करणारे होते. त्यांनी हिंदू समाजाच्या प्रश्नांवर बिनधास्त भूमिका घेतली; मात्र त्यांचे हिंदुत्व कर्मकांडात अडकलेले नव्हते; ते राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक होते. ते म्हणत, की मी हिंदुत्त्वाचा वापर सत्तेसाठी करीत नाही, तर हिंदूंना जागे करण्यासाठी करतो. या स्पष्टतेमुळेच ते टीकेचे धनी झाले, पण त्यांनी कधीही माघार घेतली नाही. हिंदुत्त्वाबाबत त्यांनी कधीच बोटचेपी भूमिका घेतली नाही. डॉ. रमेश प्रभू यांच्या निवडणुकीतील हिंदुत्त्ववादी भाषणावरून न्यायालयाने त्यांचा मताचा अधिकार काही काळ काढून घेतला; परंतु त्याची त्यांना पर्वा नव्हती.त्यानंतरही हिंदुत्त्वावर ते बेलाशक बोलत राहिले.

बाळासाहेबांत अनेक विरोधाभास होते. एकीकडे ते आक्रमक, जहाल आणि वादग्रस्त; तर दुसरीकडे ते कलावंत, छायाचित्रकार आणि सौंदर्यदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. मराठी रंगभूमी, साहित्य आणि कलाकारांबद्दल त्यांना अपार प्रेम होते. त्यांच्यावर हुकूमशहा असल्याचा आरोप झाला; पण त्यांच्याभोवती जमलेली माणसे भीतीने नव्हे, तर निष्ठेने उभी होती. ही निष्ठा आदेशाने मिळत नाही, ती विश्वासातून निर्माण होते. बाळासाहेबांनी गिरणी कामगार, बेरोजगार तरुण, मध्यमवर्गीय मराठी माणूस यांचे प्रश्न थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी राजकारणाला अभिजाततेच्या चौकटीतून बाहेर काढून रस्त्यावर आणले. ‘शिवसैनिक’ ही संकल्पना म्हणजे सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी झटणारा कार्यकर्ता. हा विचार आजही दुर्मीळ आहे. बाळासाहेब हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते. ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांनी लोकशाहीत रस्त्यावरील संतापाला व्यासपीठ दिले. त्यांनी दाखवून दिले. की निर्भीडपणा हा राजकारणातील सर्वात मोठा भांडवल आहे. आज राजकारणात शब्दांची भीती आहे, भूमिका बदलण्याची घाई आहे आणि सत्तेसाठी तडजोडींची स्पर्धा आहे. अशा काळात बाळासाहेब अधिक तीव्रतेने आठवतात. कारण ते झुकले नाहीत, वाकले नाहीत आणि विकले गेले नाहीत. जिथे इतर पत्रकार आणि विचारवंत शब्दांची काळजी घ्यायचे, तिथे बाळासाहेब थेट बोट ठेवायचे. हीच निर्भीडता पुढे त्यांच्या राजकारणाची ओळख बनली. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे तथाकथित धर्मनिरपेक्षतेला अस्वस्थ करणारे होते. त्यांनी हिंदू समाजाच्या प्रश्नांवर बिनधास्त भूमिका घेतली; मात्र त्यांचे हिंदुत्व कर्मकांडात अडकलेले नव्हते. ते राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक होते.बाळासाहेब हे केवळ शिवसेनाप्रमुख नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक होते. त्यांनी लोकशाहीत रस्त्यावरचा आवाज सत्तेच्या दालनापर्यंत पोहोचवला.

त्यांच्या विचारांशी सहमत असो वा नसो; त्यांच्या प्रभावाला नाकारणे कोणालाही शक्य नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणजे निर्भीडतेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा एक अखंड अध्याय होता, तो महाराष्ट्राच्या इतिहासात अढळपणे कोरला गेला आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात बाळासाहेब हे व्यक्तिमत्त्व केवळ राजकीय नेते म्हणून मर्यादित राहत नाही. त्यांनी केलेले राजकारण हे समाजकारणाशी घट्ट जोडलेले होते. सत्ता, निवडणुका आणि पदे यांपेक्षा समाजाचा स्वाभिमान, अस्मिता आणि प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचे वाटत. त्यामुळेच बाळासाहेबांचे राजकारण हे केवळ सत्ताकेंद्रित न राहता, व्यापक सामाजिक आंदोलनाचे रूप धारण करणारे ठरले. राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी पदाची गरज नसते. त्यासाठी विचार आणि धाडस पुरेसे असते, हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून घालून दिले. १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना करून त्यांनी मराठी माणसाच्या प्रश्नांना राजकीय केंद्रस्थानी आणले. त्या काळात मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणूस नोकऱ्यांमध्ये, उद्योगांमध्ये आणि प्रशासनात दुय्यम ठरत असल्याची भावना तीव्र होती. इतर राजकीय पक्ष या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असताना बाळासाहेबांनी थेट हस्तक्षेप केला आणि मराठी अस्मितेचा आवाज बुलंद केला. त्यांचे राजकारण सरळ, रोखठोक आणि स्पष्ट होते. तडजोडी, मवाळपणा किंवा सोयीस्कर भूमिका घेणे हे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यामुळेच ते समर्थकांसाठी प्रेरणास्थान ठरले, तर विरोधकांसाठी कायमचे आव्हान बनले. सत्तेत असो वा नसो; त्यांनी भूमिका बदलली नाही, हे त्यांच्या राजकारणाचे मोठे बळ होते.

भागा वरखडे

error: Content is protected !!
Exit mobile version