भंडारा, २५ ऑगस्ट २०२३ : पूर्व महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात एका आश्रमशाळेतील ३७ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. तुमसर येथील येरळी आश्रमशाळेत गुरुवारी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. आश्रम शाळा या निवासी शाळा आहेत ज्या आदिवासी समाजातील मुलांना माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण देतात.
भंडारा जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवार यांनी सांगितले की, आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांनी गुरुवारी उलट्या, पोटदुखी आणि तापाची तक्रार केली, त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ३२५ विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवले. त्यापैकी ३७ जणांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनीं वसतिगृहात दिलेले अन्न खाल्ल्यानंतरच ते आजारी पडल्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचा आम्हाला संशय आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना लवकरच रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य विभागाने तपासणीसाठी अन्न आणि पाण्याचे नमुने गोळा केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड