एसटी संपाबाबत राज्यातील 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन! राज्य सरकारची कारवाई

चंद्रपूर, 10 नोव्हेंबर 2021: दिवाळी सुरू होण्या आधीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पण ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रातील बरेच एसटी आगार बंद असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तर दुसरीकडं एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन आणि इतर मागण्यांसाठी राज्यभर संप सुरू आहे. कोरोना काळातदेखील एसटीला मोठा फटका बसला होता. त्यामुळं एसटी आर्थिक आघाडीवर मोडकळीला आली होती. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन सातत्यानं थकत गेलं. आता याला जोडूनच एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचा राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करण्यासाठी मागणी करत आहे. दरम्यान या काळात 36 एसटी कर्मचाऱ्यांनी आपले प्राण देखील गमावले आहेत.
पण ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु असलेला संपामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तर दुसरीकडं खाजगी वाहनांकडून प्रवाशांची लूट होताना दिसत आहे. हे पाहता आता राज्य सरकारनं संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात पहिली कारवाई केलीय. राज्यभरातील 376 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असल्याची माहिती समोर आलीय.
राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील वर्धा आणि हिंगणघाट आगारामधील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली आगारातील 14 कर्मचारी, चंद्रपुर विभागातील चंद्रपुर, राजुरा, विकाशा आगारातील 14 कर्मचारी , लातुर विभागातील औसा, उदगीर, निलंगा, अहमपुर, लातुर आगारातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील किनवट, भोकर, माहुर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलुर आगारातील 58 कर्मचारी, भंडारा विभागामधील तुमसर, तिरोडी, गोंदिया आगारामधील 30 कर्मचारी, सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील 2 कर्मचारी, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, राळेगाव, यवतमाळ आगारातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-1 आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील हिंगाली व गंगाखेड आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, नागपूर विभागामधील गणेपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमान नगर आगारातील 18 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपुर,आटपाडी आगारातील 58 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करणार
एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्था करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत, त्या मान्य केल्या गेल्या होत्या. मात्र, विलिनीकरणासंदर्भात नवी मागणी केलीय. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनिमय करेल. हायकोर्टानं हा संप बेकायदेशीर आहे असं जाहीर करुनही हा संप सुरुय. कोर्टानं सूचना केलीय की अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा