२७ व २८ जानेवारी रोजी जळगावात रंगणार तृतीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल

जळगाव ६ डिसेंबर २०२३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि के.ए.के.पी.वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, दि.२७ व २८ जानेवारी २०२४ दरम्यान जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ‘देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’ चे तृतीय संस्करण होणार आहे.

तृतीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. व्हि.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ.माहेश्वरी म्हणाले की, सुदृढ मानसीकतेसाठी प्रत्येकाने एक कला जोपासणे आवश्यक आहे. जळगाव हे कला क्षेत्रातील तिर्थक्षेत्र व्हावे यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे तसेच चित्रपटासारख्या प्रभावी क्षेत्रात अधिकाधिक विद्यार्थी उतरले पाहिजे. यासाठी काही कोर्सेस, अभ्यासक्रम नियोजनात विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल. सोबतच देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवलच्या तृतीय संस्करणाचे पोस्टर विमोचन झाल्याचे जाहीर करत महोत्सवाच्या गुणवत्तापूर्ण आयोजनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

महोत्सवाच्या प्रचार व प्रसारासाठी खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, विदर्भ अशा विविध भागात मोठ्या प्रमाणावर पोस्टर विमोचन कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, कॅम्पस फिल्म या तीन विभागांत फिल्म मागविण्यात आल्या आहेत.

विषय-
●पर्यावरण
●महिला सशक्तीकरण
●शिक्षण आणि कौशल्य विकास
●सामाजिक समरसता
● कुटुंब गाव आणि देश..
●आजच्या युगात शिवछत्रपतींचे विचार
●आधुनिक भारत
●भारतीय आस्था, कला आणि संस्कृतीची उज्वल परंपरा या विषयांवर आधारित चित्रपट महोत्सवात सहभागी केले जाणार आहेत.

प्रत्येक विभागासाठी रोख पारितोषिक व करंडक असे पुरस्काराचे स्वरूप असून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक चित्रपटास सहभाग प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. या दोन दिवसीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाच्या स्क्रिनींगसह चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचा सहवास तसेच, दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, पटकथाकार, तंत्रज्ञ यांच्या मास्टर क्लास (कार्यशाळा) होणार असून सोबतच चित्रपट दिंडी, प्रदर्शनी, टुरिंग टॉकीज यांसारखे अभिनव उपक्रम सुद्धा होणार आहेत.

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल च्या तृतीय संस्करणास राष्ट्रीय स्तरावर कार्यरत भारतीय चित्र साधना, नवी दिल्ली या संस्थेसह जळगावातील स्व.रामलाल चौबे ट्रस्ट, जैन उद्योग समुह, जळगाव जनता सहकारी बँक, डॉ.अण्णा साहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय, अजिंठा फिल्म सोसायटी, वेगा केमिकल यांसारख्या संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालये, नाट्य, चित्रपट संस्था, कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांनी ०५ जानेवारी २०२४ पर्यंत आपले चित्रपट पाठवावे असे आवाहन देवगिरी शाँर्टफिल्म फेस्टिवल चे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक तथा लेखक प्रा.योगेश सोमण आणि संयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे.

पोस्टर अनावरण कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य सौ.नेहा जोशी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पाठक, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, प्रांत सहसंयोजक विनीत जोशी, महिला विभाग संयोजक प्रा.सुचित्रा लोंढे, अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव अनिल भोळे, हितेश ब्रिजवासी व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा