अकोला, १० एप्रिल २०२३: अकोला जिल्ह्यात झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना मोफत वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
पारस येथील या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पारस येथे सभा मंडपावर झाड पडून ३० हून अधिक दबले गेले आहे.
या घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य पोहोचवण्यात आले. आणि जखमींना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच बाळापूर पोलिसांसह महसूल प्रशासनातील अधिकारी मदतीसाठी पोहोचले होते. फडणवीस यांनी घटनेची ताबडतोब दखल घेऊन जिल्हा प्रशासन, विधूत विभाग, महसूल विभाग व आरोग्य विभागाला सुचना दिल्या. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर