मथुरा, ७ ऑक्टोंबर २०२०: हाथरस घटनेनंतर जातीय हिंसाचार पसरवण्याच्या प्रयत्नात चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मथुरा जवळील टोल प्लाझावरून अटक करण्यात आली. हे चौघंही दिल्लीहून हाथरसच्या दिशेनं जात होते. त्यापैकी एक जामिया’चा विद्यार्थीही आहे. यूपीमधील दंगलीचा कट रचणारा तो पीएफआय’चा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
मसूद अहमद नावाचा अटक केलेला विद्यार्थी बहराइच जिल्ह्यातील जरवाल रोडचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अहमद हा दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया येथील एलएलबी’चा विद्यार्थी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो कॅम्पस फ्रेंड्स ऑफ इंडिया’शी संबंधित आहे, जी पॉप्युलर फ्रेंड ऑफ इंडियाची विद्यार्थी संघटना आहे.
यापूर्वी हाथरस सामूहिक बलात्काराबद्दल उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, पोस्टर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीय हिंसाचार पसरवण्याच्या उद्देशानं सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एडीजीनं सांगितलं की वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एडीजी’च्या म्हणण्यानुसार हाथरसच्या घटनेवरून काही लोकांनी शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं हाथरसच्या चांदपा पोलिस ठाण्यात या संदर्भातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे