अहमदनगर, ७ मे २०२१: पुत्रप्राप्तीबाबत इंदोरीकर महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं त्यांना दिलासा दिलाय. यानंतर आता इंदोरीकर महाराजांविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या प्रकरणी ८ आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
यापूर्वी लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. मात्र इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता अंनिसने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या याचिकेत अंनिसने इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षालाही प्रतिवादी केलंय. अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ही माहिती दिली आहे.
इंदोरीकर महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. स्री संग सम तिथीला केल्यास मुलगा होतो तर विषम तिथीला केल्यास मुलगी होते असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कार्यक्रमात केले होते. या वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात अंनिसने संगमनेर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर इंदोरीकर महाराजांनी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराज कसे दोषी आहेत याची बाजू कोर्टात मांडली. तर इंदोरीकर यांची बाजू त्यांच्या वकिलांनी मांडली. अखेर संगमनेर न्यायालयाने इंदोरीकर महाराजांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे