पेणमध्ये एकाच दिवशी ४८ जणांना कुत्र्यांचा चावा

पेण, रायगड २२ फेब्रुवारी २०२३ : रायगडच्या पेण तालुक्यात दिवसेंदिवस कुत्र्यांचा सुळसुळाट वाढतच चालला असुन आज एका दिवसात ४८ जणांना श्वानदंश झाल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे. तर एकट्या जानेवारी महिन्यात ३२९ जणांच्या कुत्रा चावल्याची नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. पेणमध्ये ठिकठिकाणी असणारी दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी पडलेली खराब झालेली मांस-मच्छी आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी पहायला मिळतात.

कुत्र्यांना या ठिकाणी पडलेले कुजके अन्न खाण्याची सवय लागल्याने कोणत्याही क्षणी वाट्टेल तेव्हा शिवशिवलेल्या दातांनी लचके तोडण्याची सवय या कुत्र्यांना लागलेली आहे. पेण मध्ये वर्दळीच्या ठिकाणी किमान चार ते पाच कुत्रे लहान मुलांच्या अंगावर येऊन चावे घेत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आज रोजी पेण तालुक्यातील शहरी भागासह विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातील तब्बल ४८ जणांच्या श्वान दंश झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचा देखिल समावेश आहे.

पेण उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज व्हॅक्सिन जरी उपलब्ध असले तरी अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने काही रुग्णांची गैरसोय होउन त्यांना कामोठे एमजीएम येथे उपचारासाठी जावे लागले आहे. पेण तालुक्यात श्वानदंश हा प्रकार नवीन नसुन दरवर्षी शेकडो श्वानदंशाच्या शेकडो रुग्णांची नोंद होत असते. एकट्या जानेवारीत ६५७ डोस घ्यावे लागले आहेत. त्यावरून तालुक्यातील श्वान दंशाची दहकता लक्षात येते.

या प्रकाराबाबत पेण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार असुन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहोत. अँटी रेबीज सिरम उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक संध्यादेवी राजपूत यांनी दिली. आठवडा भरात निर्बीजीकरणाला प्रारंभ होईल, कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची वर्क ऑर्डर काढण्यात आली असुन तिन वर्षाच्या कार्यकालात हे कामकाज चालणार आहे. या कामकाजाला पुढील आठवडाभरात प्रारंभ करण्यात येणार असुन यामध्ये सदर ठेकेदार विविध प्रकारचे साहित्य आणून त्यांना लस देणार आहेत. याशिवाय ज्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे त्यांची ओळख म्हणून गळ्यामध्ये विशिष्ठ प्रकाराचा पट्टा अडकाविण्यात येणार आहे. असेही प्रशासनाकडुन सांगण्यात आलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : स्वप्नील पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा