अहमदाबाद, ९ मार्च २०२३ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून अहमदाबाद येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याचा पहिला दिवस खूप खास आहे कारण आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान देखील मैदानावर उपस्थित आहेत. या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली होती. इंदूरमधे कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले आहे. तर टीम इंडिया या मालिकेमध्ये २-१ ने आघाडीवर आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे, भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल, तर हा चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
अहमदाबाद कसोटी पाहण्यासाठी भारतीय पंतप्रधान त्यांच्या नावाच्या स्टेडियमवर पोचले आहेत. २०११ च्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत असताना पंतप्रधानांनी शेवटचा सामना पाहिला. मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीजही स्टेडियममध्ये पोचले आहेत. या मालिकेत नाणेफेकीसाठी एक विशेष नाणे वापरण्यात आले आहे, जे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ७५ वर्षांच्या मैत्रीचे प्रतिबिंब आहे.
पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुजराती गायकांनी लोकगीते गायिले आणि संपूर्ण वातावरण गरब्याने रंगले आहे. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा सत्कार केला. त्याचवेळी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले.
संघ पुढीलप्रमाणे :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, ॲलेक्स केरी, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुनहेमन.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड