पायलट प्रजातीच्या ५१ व्हेल माशांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर अजुन ४६ व्हेल अडकल्या

कॅनबेरा,ऑस्ट्रेलिया २६ जुलै २०२३ : आज सकाळी ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर पायलट प्रजातीच्या व्हेल माशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पार्क्स आणि वन्यजीव या ऑस्ट्रेलियाच्या सेवेने सांगितले की, काल देशाच्या पश्चिमेकडील चीनेस बीचवर सुमारे १०० पायलट व्हेल मासे आले होते. रात्रभर उथळ पाण्यात अडकून पडल्याने सकाळपर्यंत ५१ व्हेलचा मृत्यू झाला असुन उर्वरीत ४६ व्हेल, खोल पाण्यात जिवंत पाठवण्याचा प्रयत्न तेथील प्रशासन करत आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी पायलट प्रजातीच्या व्हेलचा एक कळप चीनेस बीचजवळ दिसलेला. यानंतर संध्याकाळी अचानक खोल पाण्यातून व्हेलचा कळप बीचच्या किनाऱ्यावर उथळ ठिकाणी येऊ लागला आणि थोड्याच वेळात संपूर्ण समुद्रकिनाराभर व्हेल पसरल्या. बहुतेक वाट चुकल्याने या व्हेल रात्रभर किनाऱ्यावर अडकून पडल्या. सागरी जीव तज्ञांनी सांगितले की, व्हेल माशांचे असे अचानक किनाऱ्यावर येणे हे एखाद्या रोगाच्या प्रसाराचे लक्षण असू शकते. एवढ्या मोठ्या संख्येने व्हेल किनाऱ्यावर येण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

जेंव्हा मंगळवारी सकाळी ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ पायलट व्हेलचा समूह दिसला, तेंव्हाच निरीक्षणासाठी सागरी तज्ञ आणि स्वयंसेवकांनी समुद्रकिनाऱ्याजवळ सर्व उपकरणांसह जहाजे आणि जाळ्यांसह ठाण मांडले होते. पर्थ प्राणीसंग्रहालयातील डॉक्टर-तज्ञांनी रात्रभर किनाऱ्यावर कॅम्पिंग केले, जेणेकरून व्हेलवर लक्ष ठेवता येईल. ऑस्ट्रेलियातील प्राणी प्रेमी आणि इतर अनेकांनी या कार्यात मदत केली. संध्याकाळपर्यंत सर्व व्हेल किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर रात्री त्यांचे मृत्युसत्र सुरु झाले. आता राहिलेल्या ४६ व्हेल माशांना खोल पाण्यात जिवंत पाठवण्याचा प्रयत्न हि मंडळी करत आहेत.

पायलट व्हेल ही सागरी डॉल्फिनची एक प्रजाती आहे जी समूहामध्ये प्रवास करते. व्हेल तज्ञांच्या मते, पायलट व्हेल नेहमी एकत्र राहतात. एक व्हेल कुठेतरी अडकली तर इतरही त्याचा पाठलाग करतात. त्यामुळेच समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक व्हेल एकत्र मरण्याच्या घटना घडत आहेत. एखादी व्हेल चुकून किनाऱ्यावर येते आणि नंतर संकटात सापडल्यावर इतर व्हेलला सिग्नल पाठवते. सिग्नल मिळाल्यावर इतर व्हेलही त्या दिशेने जातात आणि अडकतात. स्कॉटलंडमध्ये आठवडाभरापूर्वी ५५ व्हेलचा तर गेल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये ५०० पायलट व्हेल मृत्युमुखी पडल्या होत्या. ऑस्ट्रेलियातही मॅक्वेरी हार्बरजवळ २०० च्या आसपास व्हेल मरण पावले.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा