पुणे, 12 जुलै 2022: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. चार तारखेला पाऊस पडत नसल्यामुळं महानगरपालिकेकडून पाणी कपातीची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होताना दिसत आहे.
खडकवासला धरणातील वाढती आवक लक्षात घेता खडकवासल्यातून होणारा विसर्ग दुपारी 12 वाजल्यापासून 5 हजार 992 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. काल रात्रीपासूनच धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात झाली होती. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरु असणारा 856 क्युसेक वेगाचा विसर्ग आज स. 6 वाजल्यापासून 2,586 क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला होता. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
तब्बल 2 टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा अवघ्या 24 तासात वाढला. पाणलोट क्षेत्रातील विक्रमी पावसामुळं चारही धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक सुरु असून गेल्या 24 तासात पाणीसाठा जवळपास 2.09 टीएमसीने वाढला आहे. एकूण पाणीसाठा आता 10.79 टीएमसी झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे










































