जळगावमधील ६० चटई उद्योग बंद; कोट्यवधींचा फटका, हजारो कामगार बेरोजगार

जळगाव, २७ डिसेंबर २०२२ : मागील काही दिवसांपासून जगभरात आर्थिक मंदी येणार असल्याच्या चर्चा, दावे होत आहेत. अनेक ठिकाणी तर कर्मचाऱ्यांची कपात केल्याचेही समोर आले. २०२३ मध्ये आर्थिक मंदी आल्यास जगावर मोठं संकट उभं राहू शकतं. जगभरातील आर्थिक मंदीच्या सावटाचा परिणाम जळगावमधील चटई उद्योगावरही झाला असून, जळगावमधील ६० चटई उद्योग बंद पडले आहेत. काही चटई उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.

केळी, कापूस, सोने, डाळ उद्योगासह चटई उद्योगासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून जागतिक पातळीवर रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोनाचं जगावर येऊ पाहत असलेलं सावट यांचा एकत्रित परिणाम पाहाता जगावर आर्थिक मंदीचं सावट आलं आहे. त्यामुळं जगभरात दोनशे कोटी रुपयांची आणि देशांतर भागात होणारी चटईच्या विक्रीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळेच जळगाव शहरातील १५० पैकी ६९ उद्योग बंद पडले आहेत. तर आणखी काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

जळगावमधून युरोप, दक्षिण आफ्रिकेसह अरब आणि आशिया खंडात अनेक देशांत चटई निर्यात केली जाते; मात्र मंदीचे सावट पाहता अनेक देशांनी तूर्तास चटई खरेदीचे प्रमाण अतिशय कमी केले आहे. त्यामुळे उत्पादन आणि निर्यात करणे अनेक चटई उद्योगांना परवडत नाही. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले असल्याचं चटई उद्योजकांचं म्हणणं आहे. जागतिक पातळीवर तर अडचणी येत असताना स्थानिक पातळीवरही अनेक अडचणींचा सामना चटई उद्योजकांना करावा लागत आहे. वीज आणि कच्च्या मालाच्या वाढत्या दरांमुळेही अनेक उद्योग बंद झाले आहेत. बंद पडलेले उद्योग वाचविण्यासाठी सरकारने मदतीचा हात द्यायला हवा, अशी मागणी जळगावातील चटई उद्योजकांनी केली आहे.

जागतिक बँकेकडून आर्थिक मंदीचा इशारा
पुढील वर्षी जगभरात आर्थिक मंदी येऊ शकते, आसा इशारा सप्टेंबरमध्ये जागतिक बँकेने आपल्या अहवालात दिला होता. जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले होते, की जागतिक मंदीची काही चिन्हे आधीच प्राप्त होत आहेत. १९७० च्या मंदीनंतर सर्वांत मोठ्या घसरणीला पोचली असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आर्थिक धोरण कडक केल्यामुळे महागाई नियंत्रित करण्यासाठी उत्पादन वाढविणे आणि पुरवठ्यातील अडथळे दूर करणे आवश्यक असल्याचेही जागतिक बँकेनं सांगितलं. ‘आयएमए’च्या ऑक्टोबरमधील अहवालानुसार, २०२३ मध्ये जागितक अर्थव्यवस्था एक तृतीयांशपेक्षा जास्त प्रमाणात ढासळू शकते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा