सहावे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन 14 जानेवारीला,धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार डॉ. मच्छिंद्र सकटे यांना जाहीर

कोल्हापूर,४ जानेवारी २०२४ : भारतीय संविधानिक मूल्यांची जपणूक करणे, लोकशाही तत्वे रुजवणे, वाचन व लेखन संस्कृती वाढविणे, महामानवांचे मानवतावादी विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच धम्म विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित एकदिवसीय सहावे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे रविवार दि. १४ जानेवारी, २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी दिली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नेते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांना या वर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, सहावा धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सहाव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संगीतकार विश्वास सुतार हे संमेलनाध्यक्ष असणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या संमेलनास डॉ. श्रीपाद देसाई, विजया कांबळे, डॉ. नंदकुमार गोंधळी, ॲड. अकबर मकानदार, रूपाताई वायदंडे, प्रा. पुष्पलता सकटे, डॉ. शोभा चाळके, आचार्य अमित मेधावी, छाया पाटील, किशोर खोबरे, स्वागताध्यक्ष डॉ. स्मिता गिरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुपारच्या सत्रात कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी व लेखक डॉ. अमर कांबळे हे असणार आहेत.यावेळी निमंत्रित कवी म्हणून कवी रंजना सानप, नामदेव मोरे, प्रकाश नाईक, उद्धव पाटील, संघसेन जगतकर, रमेश नाईक, स्वप्नील गोरंबेकर, शांतीलाल कांबळे आदी मान्यवर कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. तसेच या कवी संमेलनात नवकवींना कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.

संमेलनाचे आयोजन अनिल म्हमाने, डॉ. दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर, सनी गोंधळी, विमल पोखर्णीकर, डॉ. निकिता चांडक, नीती उराडे, नामदेव मोरे, वृषाली कवठेकर, अनिता गायकवाड, अरहंत मिणचेकर, अनिरुद्ध कांबळे यांनी केले असून धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनास कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व संमेलनाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी केले आहे.या पत्रकार परिषदेस डॉ. दयानंद ठाणेकर, सनी गोंधळी, विमल पोखर्णीकर, डॉ. निकिता चांडक, नामदेव मोरे, वृषाली कवठेकर, अश्वजित तरटे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा