अंकारा, ६ फेब्रुवारी २०२३ : तुर्कस्तान आणि बाजूच्या देशांमध्ये सोमवारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. तुर्कस्तानच्या नूर्दगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर इतकी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तूर्कस्तानशिवाय सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये भूकंपाचे हादरे बसले आहेत. सुमारे एक मिनिट चाललेल्या या भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप जमिनीपासून जवळपास १४.१ किलोमीटर खोलीवर झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ४.१७ वाजता या परिसरात भूकंपाचे हादरे बसले.
या भुकंपामुळे आतापर्यंत तुर्कस्तानमधील ७६ जणांचा तर सीरियामधील ४२ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
- अनेक इमारती कोसळल्या
राज्य प्रसारक TRT कडील फोटोंमध्ये इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. लोक बचावासाठी बर्फाळ रस्त्यांवर अडकले आहेत. रॉयटर्सच्या मते, हा भूकंप सुमारे एक मिनिट चालला. यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या भागात अनेक भूकंप झाले आहेत.
- पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
तुर्कस्तानमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित, वित्तहानीमुळे दुःख झाल्याचे ट्वीट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन केले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.