पुणे १८ डिसेंबर २०२४ : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, आज (१८ डिसेंबर) रोजी दुपारी ३ वाजता सवाईच्या ७० व्या स्वरयज्ञाला सुरुवात होईल.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी १८ ते २२ डिसेंबर दरम्यान ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार असून कार्यक्रमस्थळी सुमारे हजारो संगीत रसिकांना सामावून घेणा-या भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून यंदाच्या महोत्सवाला सुरुवात होईल. सुरुवातीला भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन होईल. यानंतर किराणा घराण्याचे गायक उस्ताद मुबारक अली खान आणि गायक सुधाकर चव्हाण यांच्या शिष्या व सुपुत्री शाश्वती चव्हाण- झुरुंगे आपली गायनसेवा प्रस्तुत करतील. यांनतर आग्रा व जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक राम देशपांडे यांचे गायन होईल. व्हायोलिन वादक डॉ. एल सुब्रमण्यम यांचे कर्नाटक शैलीतील वादन ऐकण्याची संधी यानंतर रसिकांना मिळेल. पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रबर्ती यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप होईल.
महोत्सवासाठी येणा-या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आलीय. कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स व अद्ययावत ध्वनी यंत्रणा, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत. शिवाय मंडपाच्या एका बाजूस संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत असे प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएल तर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे आयोजकांनी नमूद केलय.
न्युज अनकट प्रतिनीधी