पाच क्षेत्रीय कार्यातील ७१ हजार कुटुंबाचे होणार स्थलांतर

पुणे, दि. २८ एप्रिल २०२० : सध्याच्या परिस्थितीत पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आणि संशयित आढळत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाच क्षेत्रिय कार्यालयांमधील सुमारे ७१ हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी पोलिसांच्या मदतीने सोमवारी (दि.२७) दुपारपासून सुरू केली आहे.
कुटुंबाची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळा, खासगी मंगल कार्यालये, वसतीगृहांमध्ये करण्यात येणार आहे. स्थलांतर होण्याऱ्यांमध्ये भवानी पेठ, ढोले पाटील रोड, कसबा पेठ, घोले रोड आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जवळपास ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. याशिवाय मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही याच भागात अधिक आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सुनील फुलारी, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पंकज देशमुख आदींनी या पाचही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भागांना भेट दिली आणि आढावा घेतला आहे.
या दाट लोकवस्तीमध्ये असणारी अनेकांची घरे सुमारे शंभर चौरस फुटांची आहेत. त्या कुटुंबात ४ ते ५ जण राहतात. त्यामुळे सोशल डिन्स्टिसिंगच्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी महापालिकेच्या शाळा, खासगी मंगल कार्यालये आणि वसतिगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांतून तेथे जेवण, न्याहारी पुरविणे शक्य आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
महापालिकेने ७१ हजार कुटुंबे स्थलांतर करण्याची तयारी केली असली तरी पहिल्या टप्प्यात सुमारे २० हजार कुटुंबेच स्थलांतरीत होतील, असा अंदाज वर्तवला आहे.
तेथे स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. एक आड एक, घरातील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात येईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.
क्षेत्रीय कार्यालये – भवानी पेठ, ढोले पाटील रोड, कसबा पेठ, घोले रोड आणि येरवडा
हॉट स्पॉटमधून स्थलांतर कराव्या लागणाऱ्या कुटुंबांची संख्या – सुमारे ७१ हजार
स्थलांतर करावी लागणारी लोकसंख्या – सुमारे ३ लाख ५० हजार
शहरातील एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण या भागातील
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्येही या भागातील रहिवाशांचे प्रमाण ७० टक्क्यांहून जास्त.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा