कामात टाळाटाळ करणाऱ्या ७६ बीएलओंची चौकशी

पुणे, ३ ऑगस्ट २०२३ : मतदान नोंदणीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या ७६ केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महानगरपालिकेला दिले आहेत. शहरातील आठही विधानसभा मतदांरसंघात मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघात मात्र अत्यल्प मतदार नोंदणी झाल्याचे समोर आले होते.

प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी ज्या शिक्षकांना बीएलओ म्हणून नेमले होते. त्यांनी कामात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा केल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची कडक दखल घेतली आहे. त्यानुसार त्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करित महापालिकेच्या शाळांमधील बीएलओ म्हणून नेमणूक केलेल्या सर्व संबंधित शिक्षकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर पालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज सांभाळून मतदान नोंदणीचे काम करायचे आहे. या कामात संबंधित कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचे सिद्ध झाल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर