लखनऊ, २० सप्टेंबर २०२२: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका ८ वर्षीय मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा ही घटना उघडकीस आली. पीडित मुलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय.
याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी गुडंबा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली. आरोपी मुलीच्या घरात भाड्यानं राहत होता. याप्रकरणी आरोपींवर कारवाई सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद लखनऊच्या ठाणे गुडंबा भागात राहणाऱ्या पीडित कुटुंबाच्या घरात राहत होता. विनोदने २ दिवसांपूर्वी १७ सप्टेंबर रोजी ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.
मुलीच्या कुटुंबीयांना घटनेच्या दिवशी माहिती मिळू शकली नाही. यानंतर मुलीची तब्येत बिघडली आणि रक्तस्त्राव सुरू झाला तेव्हा कुटुंबीय तिला डॉक्टरांकडं घेऊन गेले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
डीसीपी नॉर्थ झोन कासिम अब्दी म्हणाले, “पोलिसांना ११२ क्रमांकावर ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांच्या सांगण्याच्या आधारे नोंद करून तपास सुरू केला.
ते पुढं म्हणाले, “यानंतर तात्काळ पोलिसांचे पथक दाखल करण्यात आले आणि आरोपी २४ वर्षीय विनोद याला अटक करण्यात आली. मुलगी अजूनही रुग्णालयात आहे, तिची प्रकृती स्थिर आहे. पुढील कारवाई सुरू आहे. घटना १७ सप्टेंबरची आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे